विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ
वृत्तसंस्था / बुडापेस्ट
शनिवारी येथे विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेला प्रारंभ झाला पण भारतीय स्पर्धकांना पहिला दिवस अपयशी ठरला. पुरूषांच्या चालण्याच्या शर्यतीत सहभागी झालेला भारताचा राम बाबू याला चौथ्यांदा लाल कार्ड दाखवून अपात्र ठरविण्यात आले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरूषांची 35 कि.मी. पल्याची चालण्याच्या शर्यतीचा क्रीडा प्रकार घेण्यात आला. यामध्ये विविध देशांचे सुमारे 50 स्पर्धक सहभागी झाले होते. पण त्यापैकी 6 स्पर्धकांना पंचांनी अपात्र ठरविले. त्यात राम बाबूचा समावेश होता. 50 स्पर्धकांपैकी केवळ 34 स्पर्धकांनी ही शर्यत पूर्ण केली. महिलांच्या चालण्याच्या शर्यतीच्या प्रकारात भारताची राष्ट्रीय विक्रमवीर विजेती प्रियांका हिला 24 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 3 तास 5 मिनिटे आणि 58 सेकंदांचा अवधी घेतला. महिलांच्या या क्रीडा प्रकारात 46 स्पर्धकांचा समावेश होता.