मनपामध्ये माहिती अधिकार हक्क कायद्यासंदर्भात कार्यशाळा
अॅड. अशोक हलगली यांनी केले मार्गदर्शन
बेळगाव : माहिती अधिकार हक्क नेमका काय आहे? या कायद्यांतर्गत ग्राहक किंवा इतर व्यक्तींनी आरटीआयअंतर्गत अर्ज दिल्यानंतर संबंधितांना किती दिवसात माहिती दिली पाहिजे? 2005 पासून अंमलात आलेला हा कायदा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. आरटीआय अॅक्ट 2005,4 (1)(A) आणि 4(1)(ँ) हे नेमके काय आहे, याबाबत अॅड. अशोक हलगली यांनी मार्गदर्शन केले.
सरकारी कामासंदर्भातील कोणती फाईल किती वर्षे सुरक्षित ठेवली पाहिजे, याची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. आरटीआय कायद्यामध्ये वेगवेगळे विभाजन केले आहे. 2005,4(1)(A) मध्ये ए बी सी डी ई असा वर्ग करण्यात आला आहे. ए मध्ये फाईल चंद्र, सूर्य आहे, तोपर्यंत जपून ठेवली पाहिजे. बी मध्ये तीस वर्षांपर्यंत फाईल जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. सी मध्ये दहा, डी मध्ये पाच वर्षे, ई मध्ये केवळ एक वर्ष ठेवणे बंधनकारक आहे. त्यानंतर या फाईल नष्ट केल्या तरी चालू शकते.
यावेळी 4 (1)(ँ) संदर्भातही माहिती देण्यात आली. आरटीआयअंतर्गत जी कलमे आहेत ती प्रथम समजून घ्या. त्यानुसारच अर्जदाराला माहिती द्या, असे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला महानगरपालिकेतील बहुसंख्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.