शिक्षण घेतानाच उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहा! डॉ. विश्वनाथ मगदूम यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
कॉमर्स कॉलेजमध्ये उद्योजकता विकास व शासकीय योजनेवर कार्यशाळा
कोल्हापूर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शिक्षण घेत असतानाच विविध कौशल्ये आत्मसात करून उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी दिला.
येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये वाणिज्य विभागामार्फत शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘उद्योजकता विकास आणि शासकीय योजना’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. मगदूम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. ए. पाटील होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवी साखरे यांनी उपस्थितांना उद्योजकांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये मोहन गोखले यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असण्राया पात्रता, कागदपत्रे इ. विषयी विस्तृत विवेचन केले. तर तिसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध उद्योजक तानाजी सावर्डेकर यांनी व्यवसाय सुरू करून तो कशा पद्धतीने यशस्वी करावा याबाबत माहिती देताना आपल्या उद्योजक म्हणून यशस्वी कारकिर्दीची ओळख करून दिली. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) के. जी. कांबळे, डॉ. ए. एस. बन्ने, डॉ. एस. बी. राजमाने, प्रा. एम. एन. मुजावर, सौ.एम. एस. वाडकर, सौ. शमिका मुथाने, कपिल टोपरानी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.