मानवी तस्करीविरोधात सिंधुदुर्गनगरीत कार्यशाळा
ओरोस : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व गोव्यात मानवी तस्करीविरोधात लढणाऱया ‘अर्ज’ संस्थेतर्फे जिल्हा विधी सेवा भवन येथे प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मानवी तस्करी म्हणजे जगण्याचा हक्क हिरावून घेण्यासारखे आहे. त्याचे निर्मूलन ही कुठल्या एका क्षेत्राची जबाबदारी नाही. तर सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी यावेळी केले. यावेळी गोव्यातील ‘अर्ज’चे संस्थापक अरुण पांडे, गोव्यातील निवृत्त जिल्हा न्यायाधीश सायोनारा टेलेस-लाड, मानसोपारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर, ऍड. संदीप निंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सौ. एस. डी. कारंडे, सहदिवाणी न्यायाधीश तिडके, सहदिवाणी न्यायाधीश पाटील उपस्थित होते. उद्घाटन न्या. गायकवाड यांच्या हस्ते झाले.यावेळी डॉ. पाटकर म्हणाले की, बलात्कार पीडितेचे सामाजिक अवमूल्यन केले जाते. २००७-०८ मध्ये आपण गोव्यात मानसिक आरोग्य संस्थेत काम केले. ७० टक्के मुली या अल्पवयीन असताना या व्यवसायात ढकलले जाते. रेडलाईट एरियामुळे बलात्कार कमी होतात, याला कोणताही पुरावा नाही. आज या व्यवसायातील मुलींच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे. त्यादृष्टीने सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.या कार्यशाळेला ‘तरुण भारत संवाद’ संपादक शेखर सामंत, दत्तप्रसाद वालावलकर, ऍड. अरुण पणदूरकर, बॅ. नाथ पै सेवांगणचे लक्ष्मीकांत खोबरेकर, अंगणवाडी कर्मचारी संघटना नेत्या कमलताई परुळेकर तसेच न्यायपालिका, पोलीस, बालकल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग आदी सरकारी विभागातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ‘मुक्ती’ गटातून ऍड. संदीप निंबाळकर, डॉ. सई लळीत, राजेश मोंडकर, जुईली पांगम, प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे, सहदेव पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.