For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामे अर्धवट तरी महापालिकेकडे हस्तांतरित

10:58 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कामे अर्धवट तरी महापालिकेकडे हस्तांतरित
Advertisement

स्मार्ट सिटीच्या कारभाराबद्दल नाराजी : मनपाला नाहक भुर्दंड : पूर्ण झालेल्या कामांबद्दल फलकांद्वारे माहिती देण्याकडे दुर्लक्ष

Advertisement

बेळगाव : शहरातील विकासकामे करत असताना त्याबाबतचे फलक लावले जातात. मात्र  बऱ्याच ठिकाणी फलक लावायचे टाळले जाते. परिणामी कोणत्या निधीतून व कोणत्या योजनेतून हे काम होत आहे? हे समजणे अवघड झाले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली. मात्र बरीच विकासकामे अजूनही अर्धवट आहेत. असे असताना महानगरपालिकेकडे ही कामे पूर्ण झाली म्हणून हस्तांतर करण्यात आली आहेत. परिणामी महानगरपालिकेवर उर्वरित कामांचा ताण पडत आहे. याचबरोबर निधी खर्च करावा लागत आहे, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी टू फेसमध्ये समावेश आहे. यासाठी 135 कोटींचा निधी मिळणार आहे. मात्र जर अशाचप्रकारे कामे अर्धवट करून महानगरपालिकेकडे हस्तांतर केली जात असतील तर हा शहरवासियांनाच मोठा फटका बसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट सिटीअंतर्गत केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून निधी मिळतो. पण काम अर्धवट झाले तर महानगरपालिकेला आपला निधी खर्च करावा लागत आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत  जोरदार चर्चा झाली होती. पण त्यानंतर या कामांचा लेखाजोखाच झाला नाही.

शहर आणि उपनगरांतील विविध रस्ते, गटारींचे बांधकाम आणि अन्य विकासकामांसाठी स्मार्ट सिटीमधून निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र अनेक प्रभागातील कामे अर्धवट आहेत, अशा तक्रारी जनतेतून होत आहेत. अर्धवट कामे असताना मनपाकडे हस्तांतर झाले तर त्याचा फटका शहरवासियांनाच बसणार आहे. तेव्हा महापौर, उपमहापौर, तसेच नगरसेवकांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आता पुन्हा शहराला केंद्र सरकारकडून विकासासाठी निधी मिळणार आहे. मात्र त्याचे नियोजन करणे, याचबरोबर त्या निधीतून सर्व कामे लक्ष देऊन केली पाहिजेत. अन्यथा यावेळीही अर्धवट कामे करून महानगरपालिकेकडे हस्तांतर केली तर नाहक भुर्दंड बसू शकतो. महापालिकेकडे निधी नसल्याने विकासकामे राबविण्याकडे दुर्लक्ष होत असते. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विकासकामे राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध चौक आणि रस्त्याशेजारी विकासकामांच्या जाहिरातीचे फलक सर्वत्र झळकले होते. मात्र आता काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत कोणतीच माहिती या फलकांच्या माध्यमातून दिली जात नाही. त्यामुळे काम पूर्ण झाले की अर्धवट आहे, हे देखील समजणे अवघड आहे. स्मार्ट सिटीने कामे पूर्ण केली असून आपल्याकडे त्यांनी हस्तांतरित केल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र हस्तांतरित करताना ती कामे पूर्ण झाली आहेत का? याचा सर्व्हेदेखील होणे गरजेचे होते. कारण बरीच कामे अर्धवट असताना मनपाकडे तो विभाग हस्तांतरित झाल्याचे दिसून येत आहे. अनगोळ, भाग्यनगर, वडगाव, हिंदवाडी, अयोध्यानगर, सुभाषनगर यासह अनेक ठिकाणी कामे अर्धवट असल्याच्या तक्रारी होत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.