For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्नशील

10:40 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्नशील
Advertisement

मंत्री प्रियांक खर्गे यांची विधानसभेत माहिती

Advertisement

बेळगाव : ग्रामीण भागातील शुद्ध पेयजल प्रकल्पांच्या देखभालीसाठी राज्य पातळीवर एखादी संस्था नेमण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती ग्रामीण विकास व पंचायतराज खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी विधानसभेत दिली. बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात हिरेकेरुरचे आमदार यु. बी. बनकार यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले, ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार, खासदारांच्या अनुदानातून अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्यांची देखभाल करताना अडचणी येत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन देशातील एखाद्या प्रतिष्ठित संस्थेशी संपर्क साधून त्यांना कंत्राट देण्याचा विचार सुरू आहे. मात्र, अनेक कंपन्यांशी संपर्क साधूनही देखभाल करण्यासाठी कोणीही तयार होत नाही, अशी परिस्थिती आहे. तरीही सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. लवकरच या समस्येवर तोडगा काढण्यात येईल, असे प्रियांक खर्गे यांनी सांगितले.

हावेरीत 9 गावांतील पाण्यात फ्लोराईड

Advertisement

हावेरी जिल्ह्यातील 685 गावांमधील पाण्यांचे नमुने तपासण्यात आले आहेत. नऊ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड आढळून आले आहे. यापैकी आठ गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. पर्यायी पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रा. पं. कडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी

सर्व ग्रामपंचायतींच्यावतीने दरमहा पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. यासाठी प्रयोगशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 6 लाख 50 हजार पाण्याचे नमुने तपासण्यात आले असून त्या त्या गावांनाही तपासणीचे किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींकडून सुरू करण्यात आलेल्या शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्पाच्या देखभालीत व्यत्यय येत नाही. आमदार, खासदारांच्या अनुदानातून सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांसाठीच ही समस्या असून लवकरच ही समस्या दूर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.