For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणदूर येथे बांधकाम कामगार स्नेहसंमेलन आणि आरोग्य शिबीर

04:36 PM Feb 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पणदूर येथे बांधकाम कामगार स्नेहसंमेलन आणि आरोग्य शिबीर
Advertisement

 १६ फेब्रुवारी रोजी श्रमिक कामगार कल्याणकरी संघाचे आयोजन

Advertisement

वार्ताहर / कुडाळ

श्रमिक कामगार कल्याणकरी संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, कामगार स्नेहसंमेलन आणि भव्य आरोग्य शिबीर व उपचार मार्गदर्शन हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पणदूर हायस्कुल कै. सौ. गंगाबाई दळवी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना कुठेतरी व्यासपीठ मिळाव व त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने येथील हॉटेल कोकोनट येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.यावेळी श्रमिक कामगार संघटनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष नारायण येरम, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विजय बागकर, वेताळ बांबर्डे प्रभाग अध्यक्षा संजना पाटकर उपस्थित होते.प्राजक्त चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे. पहिलीपासून त्यांच्या अंतिम शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे. यासाठी पाचशे विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या हिताच्या महाराष्ट्र शासनाच्या सुमारे 21 योजना आहेत. त्या योजनांचा लाभ अजूनही कामगारांपर्यंत पोहोचलेला नाही. काही योजनांची माहिती कामगारांना आहे. तर काही योजनांची त्यांना माहिती नाही. त्या योजनांबाबत सुद्धा यावेळी कामगारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. परंतु कष्टकरी वर्ग अजूनही यापासून वंचित आहे. काही कामगार नोंदणी करतात. परंतु नोंदणीचे ते दरवर्षी नुतणीकरण करीत नाहीत.त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द होते. त्यामुळे त्यांना त्या योजनांचा लाभ मिळत नाहीत. त्यामुळे कामगारांनी दरवर्षी नोंदणी नुतणीकरण करणे आवश्यक आहे.तसेच बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजित करण्यात आले आहे. पूर्वी कामगारांची या शिबीरात फक्त रक्त तपासणी केली जायची. परंतु आता या शिबीरात कामगारांच्या विविध तपासण्या आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही बांधकाम कामगार संस्थांकडे मिळून जिल्ह्यात सुमारे २५ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये बांधकाम क्षेत्रातले १०१ प्रकारची कामे करणारे कामगार समाविष्ट आहेत. तसेच नोंदणी करणारे २० ते २५ हजार कामगार सिंधुदुर्गातीलच आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे बंद असलेले कामगार नोंदणी पोर्टल आता सुरु झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.