कामगारांच्या मुलांना मिळणार शिष्यवृत्ती
23 कोटी रुपये अदा : कामगारांना दिलासा, अर्जाचे आवाहन
बेळगाव : कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी 23 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय संबंधित बांधकाम कामगारांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहनही जिल्हा कामगार संघटनेतर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात 2 लाख 30 हजार इतकी बांधकाम कामगारांची संख्या आहे. त्यामध्ये 10 हजारहून अधिक शिक्षण घेत असलेल्या मुलांची संख्या आहे. यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती रखडली होती. त्यामुळे कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक कार्यात अडचणी येत होत्या. मात्र आता कल्याण मंडळाने राज्यातील 25 हजार मुलांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. शिवाय यासाठी 23 कोटी रुपयांचे अनुदानही देऊ केले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. बांधकाम कामगारांच्या प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी, पदव्युत्तर आणि इतर पॅरामेडिकल कोर्समध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. मागील दोन वर्षात शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.