कामगार गोव्याच्या प्रगतीचा कणा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ‘श्रम गौरव’, ‘श्रमिक मित्र’ पुरस्कारांचे वितरण
पणजी : गोवा राज्य आज ज्या औद्योगिक आणि आर्थिक उंचीवर आहे, त्याचे पूर्ण श्रेय आपल्या कष्टकरी कामगारांना जाते. कामगार हा केवळ कारखान्याचा घटक नसून तो राज्याच्या प्रगतीचा खरा कणा आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्पादकता वाढवणाऱ्या कामगारांची दखल घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. काल, शुक्रवारी कामगारदिनानिमित्त दोनापावला येथील लोक भवन येथील दरबार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कामगारमंत्री बाबुश मोन्सेरात, कामगार नेते पुती गावकर व कामगार आयुक्त उपस्थित होते.
राज्यात 1 लाख 40 हजार कामगार
कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा योजने अंतर्गत त्याला 50 हजार रुपयांची आर्थिक भरपाई मिळेल, तर जखमी झाल्यास 25 हजार रुपयांची भरपाई मिळेल. राज्यात 1 लाख 40 हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी कामगार खात्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. देशाच्या तसेच राज्याच्या प्रगतीत कामगारांचे मोठे योगदान आहे. आत्मनिर्भर भारतासोबतच 2037 पर्यंत विकसित गोव्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामगारांच्या योगदानाची गरज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता खाजगी कंपन्यांमध्येही चांगला पगार मिळतो. खाजगी कंपन्यांत 20 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या सर्व कामगारांचा यापुढे सन्मान केला जाईल. राज्यात दोन प्रकारचे कामगार आहेत.
विविध कारखान्यांत काम करणारे कामगार आणि बांधकामक्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची स्वतंत्र नोंदणी आहे.ट्याला पाणी घालून उद्घाटन सोहळा झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रातील 20 गुणवंत कामगारांना ‘श्रम गौरव‘ आणि ‘श्रमिक मित्र’ पुरस्कार 2026 प्रदान करून गौरव केला. यावर्षी 20 कामगारांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली होती. त्यांच्या कामातील सातत्य, सुरक्षा नियमांचे पालन आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे करण्यात आली. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांच्या हस्ते एका विशेष स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. ज्यात पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.