माकडाने चावा घेतल्याने कामगार गंभीर जखमी
कारवार : माकडाने चावा घेतल्याने कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना दांडेली येथील इएसआय रुग्णालयात घडली आहे. जखमी कामगाराचे नाव प्रवीण वेंकटेश वासंदर (रा. नवग्राम, आंबेवाडी) असे आहे. घटनेबद्दल अधिक माहिती अशी काल रविवारी संध्याकाळी दांडेली येथील इएसआय रुग्णालयाच्या आवारात काँक्रीटचे काम करून प्रवीण घरी जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी प्रवीण यांच्यावर माकडाने अचानक हल्ला चढविला. त्याने प्रवीणच्या पायाचा चावा घेतल्याने पायावर 12 टाके घातले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याला किमान दोन ते तीन महिन्यांची विश्रांती द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्याचे कुटुंब अधिक अडचणीत आले आहे. त्याकरिता वन खात्याने प्रवीणच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी आणि उपचाराची रक्कम द्यावी. शिवाय माणसांचा चावा घेणाऱ्या त्या माकडाला ताब्यात घेवून अन्यत्र सोडून द्यावे, अशी मागणी दांडेलीचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते तश्चर सौदागार यांनी केली आहे.