For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निविदा न मागविता साळ नदीतील गवत हटविण्याचे काम

12:19 PM Mar 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
निविदा न मागविता साळ नदीतील गवत हटविण्याचे काम
Advertisement

सरकारी निधीचा हा उघड गैरवापर : वॉरन आलेमाव यांचा जलस्रोत खात्यावर आरोप

Advertisement

मडगाव : जलस्रोत खात्याकडून करण्यात येणारे खारेबंद पुलाजवळून बाणावलीमधून जाणाऱ्या साळ नदीतील गवतवजा वनस्पती हटविण्याचे काम वादग्रस्त ठरले आहे. कारण निविदा न मागवता खात्याकडून हे काम राबविण्यात येत आहे. जलस्रोत खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी दावा केला आहे की, खात्याकडून पाण्यातील गवतवजा वनस्पती साफ करुन नदीच्या प्रवाहातील अडथळे काढण्याचे काम विभागीयरित्या राबविले जात आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ता वॉरन आलेमाव यांनी सरकारी निधीचा हा उघड गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. बाणावली मतदारसंघात भ्रष्टाचार खोलवर पसरला आहे. जलस्रोत खात्याच्या कामामुळे तो पुन्हा उघडकीस आला आहे. साळ नदीतील काम निविदा न काढता करून सरकारी निधीचा उघडपणे गैरवापर केला जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

गवत आणि वनस्पती काढून टाकणे ही एक लबाडी आहे. कारण ते नदीकाठावर टाकल्याने पुन्हा वाढ होईल आणि त्यामुळे करदात्यांचा पैसा वाया जाईल. ही अक्षमता आहे की, फसवणूक आहे, असा सवाल वॉरन यांनी केला आहे. बाणावली मतदारसंघातील लोक जबाबदारीची मागणी करत आहे, असे सांगून त्यांनी बाणावली मतदारसंघातील जनता गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे. जलस्रोत खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी मात्र निदर्शनास आणून दिले की, खात्याकडून नदीतील गवत काढण्याचे काम करण्यासाठी कोणी खासगी कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेला नाही. या आठवड्याच्या सुऊवातीला पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर साळ नदीत जे काही गवत काढून टाकण्याचे काम केले जात आहे ते नदीतील अडथळे हटविण्यासाठी हाती घेतले गेले, असे त्यांनी सांगितले. साळ नदी तणमुक्त करण्यासाठी आम्ही खर्चाचा अंदाज तयार केलेला आहे. आम्ही त्यात एक असे कलम देखील ठेवले आहे की, कंत्राटदार एक वर्षासाठी देखभाल करण्यास जबाबदार असेल. एकदा हा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यानी मंजूर केला की, विभाग कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी निविदा काढेल, असे जलस्रोत खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.