For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकोटवरील शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामास उद्यापासून प्रारंभ

05:35 PM Mar 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
राजकोटवरील शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामास उद्यापासून प्रारंभ
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामास उद्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चबूतऱ्यावर ज्या खडकावर छत्रपती उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचे भाग जोडण्याचे काम केले जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. आज राजकोट किल्ला येथे शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुतळा उभारण्याच्या कामास कार्यारंभ आदेश ऑक्टोबर २०२४ मध्ये देण्यात आला. दरम्यानच्या काळात निवडणुका असल्याने ही जागा २५ डिसेंबर रोजी आमच्या ताब्यात देण्यात आली. जागा ताब्यात घेतल्यानंतर जो जुना चबुतरा होता तो तोडण्यात आला. दहा फूट खुदाई केल्यानंतर त्या ठिकाणी आढळलेल्या खडकामुळे आणखी दीड मीटरची खोदाई करावी लागली. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी चबुतऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. या चबुतऱ्यामध्ये ड्युपलेक्स नावाचे स्टील पिलर उभारण्यात आले आहे. मोठमोठ्या पुलांच्या कामांमध्ये या प्रकारचे स्टील वापरले जाते ते स्टील येथे वापरण्यात आले आहे. समुद्राची खारी हवा तसेच अन्य बाबींचा विचार करून ड्युपलेक्स स्टील वापरण्यात आले आहे. पुतळ्याच्या उभारण्यासाठी चांगल्या दर्जाचे ब्रांझ वापरण्यात आले आहे. या चबुतऱ्यावर जे ब्रांझचे खडकाचे भाग आले आहेत ते बसवण्याच्या कामास उद्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी क्रेनही मागविण्यात आली आहे.शिव पुतळा उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले पार्ट्स येण्यास सुरुवात झाली आहे. यात ज्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराज उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचे भाग बसवण्याच्या कामास उद्यापासून सुरुवात होणार आहे. यात उर्वरित पुतळ्याचे भागही येथे येण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक आठवड्यात हे भाग येथे दाखल होतील. आतापर्यंत पुतळ्याचे गळ्यापर्यंतच्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. जसजसे भाग येथे दाखल होतील. त्यानुसार पुतळ्याच्या वेल्डिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. आतापर्यंत येथे दाखल झालेले पुतळ्याचे विविध भाग गाड्यांमधून राजकोट किल्ला येथे आणण्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. येथील अरुंद रस्ते ही यातील मोठी समस्या होती. याचा विचार करून या पुढील जे भाग येथे आणावयाचे आहेत ते भाग छोट्या आकाराचे बनवून ते गाड्यांच्या माध्यमातून येथपर्यंत आणण्यात येणार आहेत असे श्री. सुतार यांनी स्पष्ट केले. ज्या चबुतऱ्यावर हा पुतळा उभारण्यात येत आहे. तो चबुतरा अत्यंत दर्जेदार बनविण्यात आला असून यात जे पिलर आहेत ते जमिनीपासून सुमारे वीस फूट उंचीचे आहेत. यावर पूर्ण स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. सुमारे दीडशे हून अधिक कामगार या ठिकाणी सद्यस्थितीत काम करत आहेत.शिव पुतळा उभारण्याच्या कामाच्या २१ कोटी रुपयांची निविदा मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात यात जादा पैसा खर्च करण्यात आला आहे. कारण आयआयटी कडून पिलर हे चांगल्या दर्जाचे उभारण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या. असे असले तरी हे काम दर्जेदार व्हावे तसेच समुद्र जवळ असल्याने जी काही काळजी घेऊन हा पुतळा उभारायचा आहे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत असे श्री. सुतार यांनी स्पष्ट केले. राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात येत आहे. या कामासाठी स्थानिकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. गेल्या काही दिवसात जे काही पुतळ्याचे भाग येथे दाखल झाले ते राजकोट पर्यंत आणण्यासाठी अनेक स्थानिक नागरिकांनी आपले दगडी कुंपण यास अन्य जागा हटवून ते भाग राजकोट किल्ला पर्यंत आणण्यासाठी आम्हाला सहकार्य केले.राजकोट किल्ला येथे शिव पुतळा उभारण्याबरोबरच परिसरातच शिवकाळातील अनेक प्रसंगांचे पुतळे उभारण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचे आम्ही लक्ष वेधले आहे. शिव पुतळ्याकडे जाणाऱ्या चबुतऱ्या लगतच्या भागात अशा वेगवेगळ्या प्रसंगांचे पुतळे उभारले गेल्यास ती शिवप्रेमींसाठी एक वेगळी पर्वणी असेल याबाबत शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाने त्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतल्यास त्याची कार्यवाही केली जाईल असेही श्री. सुतार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.