For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदार याद्यांच्या कामामुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखी

11:19 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मतदार याद्यांच्या कामामुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखी
Advertisement

चार दिवसांपासून जुंपले कामाला; शिक्षकांमध्ये संताप : अभ्यासक्रम राहतोय अपूर्ण

Advertisement

बेळगाव : मतदार याद्यांमधील दुरुस्तीच्या कामासाठी बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून प्रत्येक सरकारी शाळांमधील बीएलओंना मतदार यादी देण्यात आली असून त्यामधील दुरुस्त्या तातडीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळेतील अध्यापनासोबत त्या अतिरिक्त कामामुळे शिक्षक वैतागले आहेत. सध्या नवीन मतदार याद्या रंगीत येत आहेत. 20 वर्षांपूर्वी ज्यांनी मतदार ओळखपत्र तयार करून घेतले आहे, त्यांचे फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट स्वरुपात आहेत. त्यामुळे नवीन मतदार यादीत त्यांना कलर फोटो देण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे बीएलओ शिक्षकांना आपल्या विभागातील मतदाराच्या घरी जाऊन रंगीत फोटो अॅपद्वारे जमा करावे लागत आहेत.

कुटुंबाला एकत्र आणण्यासाठीची तयारी

Advertisement

एकाच विभागात संपूर्ण कुटुंब असले तरी त्यांचे क्रमांक मात्र पुढे-मागे असतात. यामुळे मतदानावेळी आपला क्रमांक शोधावा लागतो. यासाठी संपूर्ण कुटुंब लागोपाठ असावे, यासाठी शिक्षकांना एकत्र कुटुंबाची नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना अभ्यासक्रमापेक्षा मतदार याद्यांच्या कामावरच अधिक भर द्यावा लागत आहे. बोगस मतदाराला आळा घालण्यासाठी रंगीत फोटो निवडणूक विभागाकडून जमा केले जात आहेत. परंतु यासाठी बीएलओ शिक्षकांना या कामात गुंतविण्यात आल्याने शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासोबत विविध परीक्षांची तयारी करून घेतली जात आहे. परंतु सरकारच्या या नव्या नियमावलीमुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

निवडणुकीचा भार शिक्षकांवरच

सरकारी शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामांमध्ये जुंपले जात असल्यामुळे शिक्षक संघटनेने जोरदार आंदोलन केले. परिणामी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने यापुढे शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळले जाईल, असे जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात मतदार याद्या दुरुस्तीचे काम शिक्षकांवरच देण्यात आल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Tags :

.