वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या कामाला प्रारंभ
जखमी-आजारी प्राण्यांना मिळणार आसरा : 7 हेक्टर परिसरात होणार निर्मिती
बेळगाव : भुतरामहट्टी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या वन्यप्राणी पुनर्वसन केंद्राच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी अनाथ, आजारी व जखमी वन्यप्राण्यांना आसरा मिळणार आहे. शिवाय वन्य प्राण्यांवर योग्य ते उपचार करून देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे आजारी व जखमी वन्यप्राण्यांचा देखभालीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालयाच्या शेजारी तब्बल 7 हेक्टर परिसरात वन्यप्राणी पुनर्वसन केंद्र उभारले जात आहे. विशेषत: राज्यातील तिसरे आणि बेळगावात पहिले वन्यजीव पुनर्वसन केंद्र होत आहे. त्यामुळे वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरण प्रेमीतूनही समाधान व्यक्त होत आहे. विशेषत: बेळगाव जिल्ह्यातील खानापूर वनक्षेत्रात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. जांबोटी, गोल्याळी, कणकुंबी, लोंढा, खानापूर आदी ठिकाणी वाघ, हत्ती, गवीरेडे, बिबटे, तरस, सांबर, चितळ, हरण, अस्वल आदींची संख्या वाढली आहे. दरम्यान, हे वन्यप्राणी जखमी किंवा आजारी झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे अशक्य हेते. मात्र आता पुनर्वसन केंद्राची निर्मिती होत असल्याने या ठिकाणी जखमी, आजारी किंवा अनाथ वन्य प्राण्याला आसरा दिला जाणार आहे. त्यामुळे सहाजीकच वन्यप्राण्यांचे संवर्धन होणार आहे.
या केंद्रामध्ये आजारी वन्य प्राण्यांवर योग्य ते उपचार करून आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याबरोबर या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याबरोबर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे. या ठिकाणी सुसज्ज यंत्रणा उपलब्ध करून वन्यप्राण्यांसाठी योग्य तो औषधसाठाही उपलब्ध केला जाणार आहे. वाहनांच्या धडकेत, नैसर्गिक आपत्ती, विजेचा झटका आणि वनक्षेत्रात होणारी घुसखोरी आदी कारणामुळे वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना इजा पोहोचते. शिवाय काही समाजकंटक व शिकारीमुळेही वन्यप्राणी जखमी होतात. अशा प्राण्यांना तातडीने हलवून या केंद्रामध्ये उपचार केले जाणार आहेत. यापूर्वी वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र नसल्याने वन्यप्राण्यांना आरोग्य सुविधांपासून वंचित रहावे लागते काहीवेळा उपचाराविना जंगलात प्राण्यांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत हे वन्यजीव पुनवर्सन केंद्र वन्यप्राण्यांना उपयुक्त ठरणार आहे. शिवाय उपचार झाल्यानंतर वन्यप्राण्यांना त्यांचा मूळ आधीवासात सोडले जाणार आहे.
सपाटीकरण पूर्ण
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून भुतरामहट्टी नजीक वन्यप्राण्यांसाठी वन्यजीव पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे. सपाटीकरण आणि इतर कामे झाली आहेत. कामालाही प्रारंभ झाला आहे. केंद्रात अनाथ, आजारी आणि जखमी वन्यप्राण्यांची देखभाल केली जाणार आहे.
- नागराज बाळेहोसूर (एससीएफ बेळगाव)