For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्वरी उड्डाणपुलाचे काम 50 टक्के पूर्ण

11:32 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
पर्वरी उड्डाणपुलाचे काम 50 टक्के पूर्ण
Advertisement

आता तीन टप्प्यांमध्ये वाहतुकीत बदल : वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Advertisement

पणजी : सुमारे 400 कोटी ऊपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या पर्वरी येथील उड्डाण पुलाचे काम आगामी निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने आता तीन टप्प्यांमध्ये वाहतुकीत मोठे बदल केले जाणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी महत्त्वाची बैठक घेऊन वाहतूक पोलिस यंत्रणेला याकामी आपली यंत्रणा राबविण्यास सांगितले आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम 50 टक्के पूर्ण झाले आहे. पर्वरी उड्डाणपूल निर्धारित वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदार कंपनीने प्रयत्न केले आहेत. यापूर्वी जेव्हा बांधकामाला प्रारंभ झाला त्यावेळी अत्यंत जलद गतीने कंत्राटदाराने काम सुरू केले होते आणि त्यामुळे हे काम ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होईल असे वाटत होते. परंतु वाढती वाहतूक आणि अनेक ठिकाणी आवश्यक असलेले वाहतूक वळवण्याची योजना प्रत्यक्षात अंमलात आली नाही आणि त्यामुळे कंत्राटदाराला वेळेत काम पूर्ण करणे शक्य होत नाही.

मंत्री दिगंबर कामत यांनी या अगोदर दोन-तीन वेळा प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणी जाऊन पाहणी केली, परंतु जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. अनेक सरकारी यंत्रणा गांभीर्याने ते घेत नसल्याने पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. सध्या हिवाळ्याच्या दिवसात बांधकामाचा वेग वाढणे आवश्यक होते परंतु वाहतूक वळवली जात नाही किंवा जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी पोलिस देखील ठेवले जात नाहीत. परिणामी वाहतुकीची कोंडी होते आणि त्यानंतर पुलाच्या बांधकामामध्ये देखील मोठे अडथळे निर्माण होतात. मंत्री कामत यांनी सदर पुलाचे बांधकाम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू झाली पाहिजे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच त्यांनी जिथे जिथे गरज आहे त्या त्या ठिकाणी रस्त्याचे ऊंदीकरण देखील पूर्ण केले मात्र वाहतूक वळविण्यासाठी सरकारी यंत्रणांचे पूर्ण सहकार्य आवश्यक आहे.

Advertisement

कामाचा वेग थोडा मंदावलेला होता, त्यामुळेच मंत्री दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना यामध्ये लक्ष घाला व संबंधित मंडळींबरोबर महत्त्वाची बैठक घ्या जेणेकरून पुलाचे काम गतीने होणे आवश्यक आहे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात कंत्राटदार, पोलिस, सार्वजनिक बांधकाम अधिकारी व संबंधित आमदार यांच्याबरोबर बैठक घेऊन पुलाचे बांधकाम सुरळीतपणे व गतीने व्हावे यासाठी आवश्यक ते आदेश संबंधित यंत्रणांना दिले. त्यानुसार गेल्या चार दिवसात कंत्राटदाराने कामाचा वेग वाढविला आहे. तसेच येत्या 1 जानेवारीपासून पर्वरीतील वाहतुकीमध्ये काही बदल सुरू होत आहेत. त्यानंतर कंत्राटदाराला मोकळेपणाने काम करण्यास वाव मिळेल आणि तसे झाले तर पुलाचे काम डिसेंबर 2026 च्या अखेरीस देखील संपुष्टात येऊ शकते. यासंदर्भात सरकारी यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी कंत्राटदार कंपनीने 50 टक्के काम पूर्ण केले आहे. उर्वरित 50 टक्के काम करण्यासाठी व हे काम जलद गतीने पुढे नेण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये वाहतुकीत मोठे बदल करणे गरजेचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने देखील वाहतूक वळविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

Advertisement
Tags :

.