नव्या टर्मिनल बिल्डिंगचे काम अंतिम टप्प्यात
विमानतळ अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा आढावा नुकताच एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी टर्मिनल बिल्डिंगमध्ये देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेण्यात आली.
विमानतळावर प्रशस्त अशी नवी टर्मिनल बिल्डिंग उभारण्यात आली आहे. मागील दीड ते दोन वर्षांपासून याचे काम सुरू होते. बेळगावच्या कमलबस्तीप्रमाणे टर्मिनल बिल्डिंग उभारण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावकरांना नव्या रूपामध्ये ही बिल्डिंग पाहता येणार आहे. एकाचवेळी 2400 प्रवासी हाताळण्याची क्षमता या नव्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये असणार आहे.
शुक्रवारी एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी सुरक्षेसंदर्भातील सर्व माहिती घेण्यात आली. अॅथॉरिटीच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी सर्व अधिकाऱ्यांना माहिती दिली.