हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम रोखले
झिरो पॉईंट निश्चित करा : त्यानंतरच कामाला सुरुवात करा : शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. मंगळवारी याठिकाणी कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. यामुळे कंत्राटदाराने सध्या काम बंद केले आहे. पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला असून काम बंद पाडविले आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी ती स्थगिती उठविली आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये झिरो पॉईंट निश्चित करावा, त्यानंतर या कामाला सुरुवात करावी, असा अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर सुनावणी होणे बाकी आहे. मात्र कंत्राटदाराने याठिकाणी काम सुरू करण्याची घाई केली आहे.
सोमवारी अलारवाड क्रॉसजवळ यंत्रसामग्री दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला. सध्या शेतामध्ये भात व इतर पिके आहेत. त्या पिकांचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे. अजूनही न्यायालयामध्ये या खटल्याबाबत अर्ज प्रलंबित आहे. त्याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बाजू मांडणे गरजेचे आहे. मात्र जाणूनबुजून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकील गैरहजर राहत आहेत. प्रथम झिरो पॉईंटबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, त्यानंतरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.