For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा बंद पाडले

01:17 PM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
हलगा मच्छे बायपासचे काम पुन्हा बंद पाडले
Advertisement

वर्क ऑर्डर न देताच काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक : वाहनांच्या काचा फोडल्याने तणाव

Advertisement

बेळगाव : वर्क ऑर्डर न देताच अनगोळ शिवारात हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू करण्यात आल्याने शुक्रवारी शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी विनंती करूनदेखील काम थांबविण्यात न आल्याने अखेर शेतकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी आणण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. यामुळे शेतकरी व पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. बायपास रस्त्याच्या झिरो पॉईंट निश्चितीवरून काही शेतकरी न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाकडून अद्याप या प्रकरणाचा निकाल आलेला नसताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याचे काम केले जात आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बायपासचे काम बंद पाडले होते. वर्क ऑर्डर दिल्यानंतरच या भागातील काम सुरू करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु शुक्रवारी सकाळी अनगोळ शिवारात पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले.

शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे वर्क ऑर्डरची मागणी करताच जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करण्यास सांगण्यात आले. पोलिसांनी मध्यस्थी करत टोलवाटोलवी करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जे काही म्हणणे मांडायचे असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडा, अशी सूचना करण्यात आली. मागील तीन वर्षात 100 हून अधिकवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने अखेर खडीकरणासाठी आणलेल्या वाहनाच्या काचा शेतकऱ्यांनी फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत काम बंद ठेवण्याची सूचना केली. परंतु सायंकाळी सहानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.   यावेळी अनिल अनगोळकर, सुभाष चौगुले, गोपाळ सोमनाचे, हनुमंत बाळेकुंद्री, गुंडू भागाण्णाचे, महेश चतुर, भैरू कंग्राळकर, नितीन पैलवानाचे यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.