लांजातील उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम सुरू
लांजा :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरात उड्डाणपुलाच्या कामाला आता गती येऊ लागली आहे. पुलाच्या एका बाजूने गर्डर चढविण्याचे काम शुक्रवार ६ जूनपासून सुरु केले आहे. या उड्डाणपुलावर ३९२ गर्डर बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्यावतीने देण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाच्या लांजा ते बाकेड अशा १३ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील लांजा टप्प्यात शहरातील संत निरंकारी सत्संग भवन ते एसटी डेपोपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी ९७५ मीटर तर रुंदी २५ मीटर इतकी आहे. या पुलासाठी एकूण ५० पिलर उभारण्यात आले असून लांजा शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथून या पुलाचे काम सुरू आहे. यामध्ये पूल उभारणीत २० मीटरचे गाळे ठेवण्यात आले असून पिलरची उंची साडेपाच मीटर आहे.
शुक्रवारी उड्डाणपुलाच्या एका बाजूने गर्डर चढविण्याचे काम सुरु करण्यात आले. ३९२ गर्डर गर्डर उभारण्यासाठी दोन टीम काम करत असून प्रत्येकी १५० टन वजनाच्या दोन क्रेन, ५० फुटी दोन ट्रेलर कार्यरत आहेत. दरम्यान, मागील ४ दिवस पावसाने थोडीशी उसंत दिल्याने लांजा शहरातील महामार्गाच्या कामाला गती आली आहे. सर्व्हिस रोड, पाण्याची पाईपलाईन, गटार कामे आदी कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे गतीने सुरू आहेत