For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गवंडाळी-जुने गोवे उड्डाणपुलाचे काम संथगतीने

02:56 PM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
गवंडाळी जुने गोवे उड्डाणपुलाचे काम संथगतीने
Advertisement

गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी : उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करावे

Advertisement

पणजी : गवंडाळी-जुने गोवे येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पुन्हा एकदा संथगतीने सुरू असल्याने हा पूल डिसेंबरच्या दरम्यान देखील पूर्ण होईल की नाही, हे कळण्यास मार्ग नाही. गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे या उड्डाणपुलाचे सुमारे 38 कोटी ऊपये खर्च करून बांधकाम केले जात आहे. गेले वर्षभर काम चालू असून सध्या चार खांब उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. शिवाय बाजूने एक रस्ता बांधून पूर्ण झाला आहे. प्रत्यक्षात खांबांवर कमानी चढवण्याचे काम सुरू व्हायचे आहे. हे काम लवकर सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. पुलाच्या कंत्राटदार कंपनीकडे कामगारांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातच रात्रीच्यावेळी पुलाचे बांधकाम केले जात नाही. दिवसा जे काम केले जाते ते देखील कमी कामगारांच्या मदतीने करण्यात येते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.

वाहनांची संख्या प्रचंड

Advertisement

उड्डाणपूल नसल्यामुळे रेल्वेचे फाटक रेल्वेगाड्या यायच्या अगोदर बंद केले जाते. त्यामुळे दोन्ही बाजूने प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी विशेषत: सकाळच्या वेळी दृष्टीस पडते. माशेल, आमोणे, साखळी, केरी, होंडा, वाळपई तसेच पाळी, वेळगे, सुर्ल या गावातून सकाळी प्रचंड प्रमाणात वाहने घेऊन कर्मचारीवर्ग येतो. सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर तो कर्मचारीवर्ग परत जातो. या दोन्ही काळामध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूने होते.

पोलिस नसल्यानेही अडचण

वाहतूक खोळंबत असली तरीही या ठिकाणी वाहतूक पोलिस ठेवले जात नाहीत. त्यातच एकमेकाला वाहने भिडल्यानंतर वाहनचालक एकमेकांच्या अंगावर धावून जातात, असे प्रकार दररोज घडतात. या ठिकाणी बांधण्यात येणारा उड्डाणपूल हा सर्वांसाठी वरदान ठरणार आहे, मात्र तो वेळेत पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. गोवा पायाभूत सुविधा महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी लक्ष घालतात की नाही हे कळण्यास मार्ग नाही परंतु ज्या पद्धतीने अत्यंत संथ गतीने काम चालू आहे ते पाहता पूल प्रत्यक्ष वाहतुकीस खुला होण्यासाठी आणखी वर्षभरतरी लागेल की काय? असे एकंदरीत चित्र दिसून येते.

शुक्रवारी तब्बल 25 मिनिटे वाहतूक रोखली

दररोज सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा मार्ग अत्यंत सोयीस्कर ठरतो. मात्र शुक्रवारी सकाळी 8.54 वाजण्याच्या दरम्यान रेल्वेगाडीसाठी फाटक बंद करण्यात आले. त्या ठिकाणाहून मालगाडी सकाळी 9.24 वा. धावली. दूरवरून येणारा कर्मचारीवर्ग 8.55 च्या दरम्यान त्या ठिकाणी पोचला आणि तब्बल 25 मिनिटे वाहतूक रोखून धरल्यामुळे सकाळी लवकर निघालेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रत्यक्षात कार्यालयामध्ये पोहोचायला सकाळचे 9.55 वाजले. रेल्वेगाडी येण्याच्या दहा मिनिटे अगोदर फाटक बंद करण्याचे सोडून 20 मिनिटे अगोदरच ते बंद करण्याचे प्रयोजन काय? हे कळण्यास मार्ग नव्हता. मात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यास तब्बल 25 मिनिटे विलंब झाला. त्यातच वाहतुकीची प्रचंड कोंडी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि अशा महत्त्वाच्यावेळी एकही पोलिस कर्मचारीही तिथे उपस्थित नव्हता.

Advertisement
Tags :

.