मलप्रभा नदीवरील पुलाचे काम संथगतीने
दहा महिने उलटले तरी काम अर्धवट असल्याने वाहनधारकांतून तीव्र नाराजी : काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
वार्ताहर/जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत व धिम्यागतीने सुरू असल्यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी होत आहे. मलप्रभा नदीवर सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा वाहतुकीला धोकादायक बनलेला ब्रिटिशकालीन पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून पूल पाडवून त्या ठिकाणी नवीन पूल बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या पूल बांधकामाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामाला प्रारंभ करून दहा महिन्याचा कालावधी उलटला तरी या पुलाचे अजून बरेचसे काम अर्धवट असल्यामुळे या पुलावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
वास्तविक सहा महिन्यात म्हणजे जुलै 2025 पर्यंत हा पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंत्राटदाराला देण्यात आले होते. वाहनांना ये-जा करण्यासाठी मलप्रभा नदीतून तात्पुरत्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु हा पर्यायी रस्ता नदीला आलेल्या पुरात तीनवेळा वाहून गेल्यामुळे बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला या रस्त्यावरील वाहतूक किमान दोन, तीन, महिने पूर्णपणे बंद झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. कंत्राटदाराने पुलाच्या स्लॅबचे काम घीसाडघाईने पूर्ण करून गेल्या जुलै महिन्याच्या अखेरीस हा पूल वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. मात्र या पुलावरील अद्याप बरीच कामे अर्धवट असून, पुलाचे संरक्षक कठडे तसेच पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम अद्याप अर्धवट आहे. तसेच पुलावरील रस्ता व दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे बांधकाम व इतर कामे देखील अर्धवट असल्याने वाहनधारक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पुलाला जोडणाऱ्या दोन्हीही बाजूंच्या रस्त्याचे काम अर्धवट
मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल अरुंद व कमी उंचीचा होता. मात्र नवीन पुलांची उंची व रुंदी दोन्ही वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पुलाला जोडणाऱ्या दोन्हीही बाजूंच्या रस्त्यामधील अंतर वाढले आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला केवळ माती व खडीचा भराव टाकून या ठिकाणी तात्पुरती रस्त्याची सोय करण्यात आली आहे. हा रस्ता अत्यंत अरुंद असून यावरून कसेबसे एकच वाहन ये-जा करते तसेच तात्पुरत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव घालण्यात आल्या नसल्यामुळे या ठिकाणी मोठी भगदाडे निर्माण झाली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तसेच अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर भराव घालून रस्त्याची रुंदी वाढवून हा रस्ता पक्क्या स्वरूपाचा करावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे.
पूल वाहतुकीला खुला करण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदाराने लक्ष घालून या पुलाचे अर्धवट काम त्वरित पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करावा, अशी मागणी जांबोटी भागातील नागरिकांमधून होत आहे.