कोनवाळ गल्लीतील नाल्याच्या दुरुस्तीचे काम हाती
बेळगाव : धोकादायक बनलेल्या कोनवाळ गल्लीतील नाल्याच्या तात्पुरत्या दुरुस्ती कामाला महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची कायमस्वरुपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक संतोष पेडणेकर यांच्याकडून महापालिकेकडे वारंवार केली जात होती. मात्र सध्या केवळ तात्पुरते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कोनवाळ गल्लीतील नाला धोकादायक बनला असल्याने नवीन भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेने मात्र दुर्लक्ष केले आहे. नाल्याच्या कडेला बांधलेली दगडी भिंत जुनी असल्याने ती ठिकठिकाणी ढासळली आहे.
त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह परिसरातील रहिवाशांना धोका निर्माण झाला होता. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिका जागे होणार का? तसेच दुर्घटना घडल्यास त्याला महापालिकाच जबाबदार राहील, असा आरोप स्थानिक नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी महापालिकेच्या बैठकीत केला होता. त्यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी आपल्या निधीतून कोनवाळ गल्लीच्या नाल्याचा विकास केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार नाल्यांच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. तसेच तात्पुरत्या दुरुस्तीचे काम हाती घतले असून ज्याठिकाणी भिंत कोसळून रस्त्याखालील माती ढासळली आहे. तेथे काँक्रीट घालण्यासह भराव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसाळ्यात पूर आल्यास भराव वाहून जाण्याचा धोका आहे.