Kolhapur : कोल्हापूरमध्ये परिख पुलाचे काम सुरू; वाहतुकीत बदल
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सहा महिन्यांत पूर्ण होणार
कोल्हापूर : परिख पूलाच्या नूतनीकरणासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे. येथील रस्त्याची खोदाई केली असून पहिल्यांदा ड्रेनेजपाईप लाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
एसटी स्टैंडकडून टाकाळ्याकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरु ठेवली असून रेल्वे फाटकाकडून एसटी स्टॅडकडे येणारी वाहतूक बंद ठेवली आहे. येथील रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तो रस्ता खुला करुन त्यानंतर दुसऱ्या बाजूचा एकेरी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
परिख पूल परिसरातील कामासाठी १.५ कोटींचा निधी
पूल परिसरातील रस्त्याच्या कामासाठी आणि ड्रेनेज पाईपलाईनसाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा कालावधी सहा महिने आहे. या निधीमधून पहिल्यांदा येथील ड्रेनेज पाईपलाईनचे काम होणार आहे. नंतर येथील रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
शाहूपुरी बाजारपेठत कोंडी
परिख पुलाचे काम सुरु असल्याने येथील वाहतूक शाहूपुरी बाजारपेठेकडे वळवली आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. बाजारपेठेतील वाहतूक एका बाजूने बंद केली आहे. व्हिनस कॉर्नरकडून शाहूपुरीकडे येणारी वाहतूक सुरु ठेवली आहे.