रेल्वेस्थानकातील फूटओव्हर ब्रिजचे काम पुन्हा ठप्प
कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकातील फूटओव्हर ब्रिजचे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वेरुळावरून प्रवास करीत आहेत. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून कंत्राटदाराने खासदार जगदीश शेट्टर यांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून आले. रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी जुना फूटओव्हर ब्रिज होता. वर्षभरापूर्वी तो काढून त्या ठिकाणी नवीन फूटओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु अत्यंत धिम्म्यागतीने काम सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 वर पोहोचण्यासाठी रेल्वेस्थानकाला वळसा घालून अथवा रेल्वेरुळ ओलांडून जावे लागत होते.
काही दिवसांपूर्वी खासदार जगदीश शेट्टर यांनी रेल्वेस्थानकाची पाहणी करून फूटओव्हर ब्रिजचे काम वेगाने पूर्ण करण्याची सूचना कंत्राटदार कंपनीला दिली होती. परंतु मागील 15 दिवसांपासून काम ठप्प असल्याचे दिसून आले. अमृत स्टेशन योजनेंतर्गत 15.50 कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बेळगाव रेल्वेस्थानकात विकासकामे राबविली जात आहेत. पादचारी पुलाच्या कामाला विलंब होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वयोवृद्ध प्रवाशांना पायपीट करणे अवघड होत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांकडे आपले म्हणणे मांडले. दोन दिवसांपूर्वी नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक मुकुल सरन माथूर हे बेळगावमध्ये आले असता त्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांचा ट्रॅकवरून धोकादायक प्रवास
प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला फूटओव्हर ब्रिज असल्याने नागरिकांकडून ट्रॅकवरून धोकादायक प्रवास केला जात आहे. त्यामुळे नव्या फूटओव्हर ब्रिजचे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु हे काम ठप्प असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
-प्रसाद कुलकर्णी (सदस्य-झेडआरयूसीसी)