रेल्वेस्थानकातील फूटओव्हर ब्रिजच्या कामाला गती
रेल्वे राज्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आली जाग : जानेवारी महिन्यापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकातील फूटओव्हर ब्रिजच्या कामाला अखेर गती आली आहे. बुधवारी रेल्वे स्थानकाच्या समोरील भागात फूटओव्हर ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने गर्डरचा एक एक भाग बसविण्यात आला. गर्डर बसविण्याचे काम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकावरील जुना फूटओव्हर ब्रिज वर्षभरापूर्वी हटविण्यात आला. त्या जागी नवीन ब्रिज बांधला जाईल असे सांगण्यात आले. परंतु या नव्या ब्रिजच्या कामाला दिरंगाई होत होती. त्यामुळे प्रवाशांना पूर्ण रेल्वे स्थानकाला वळसा घालून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 साठी प्रवास करावा लागत होता.
यामध्ये महिला व वयोवृद्ध यांचे सर्वाधिक हाल झाले. टेंडर मंजूर होऊन देखील संबंधित कंत्राटदाराकडून काम सुरू करण्यास विलंब झाला. मध्यंतरी खासदार जगदीश शेट्टर यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन कंत्राटदाराला जाब विचारला होता. त्यानंतरही फूटओव्हर ब्रिजचे काम संथगतीने सुरू होते. ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी फूटओव्हर ब्रिजचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना केली होती. तेव्हापासून या कामाला गती आली. गर्डर बसविण्याचे काम पूर्ण होत आले असून आता वरील कमान क्रेनच्या सहाय्याने बसविण्यात येत आहे.
खबरदारीसाठी स्टेशन रोड बंद
फूटओव्हर ब्रिजच्या कामाला सध्या वेग आला आहे. अशाच पद्धतीने काम सुरू राहिल्यास जानेवारी महिन्यात सुसज्ज फूटओव्हर ब्रिज बेळगावकरांना उपलब्ध होईल. बुधवारी रेल्वे स्थानकाच्या समोरील गर्डर बसविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्टेशन रोड बंद करावा लागला होता.
- प्रसाद कुलकर्णी (सदस्य झेडआरयूसीसी)