प्रभाग क्र.29 मधील चरी बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात
बेळगाव : शहरात 24 तास पाणी योजनेसाठी एलअॅण्डटी कंपनीकडून गल्लीबोळात खोदकाम करून जलवाहिनी घातली जात आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 29 मधील सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ आणि गुरुवारपेठ या ठिकाणी खोदाई करण्यात आली होती. सदर चरी तातडीने बुजविण्यात याव्यात यासाठी नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली रहिवाशांनी एलअॅण्डटी आणि केयुआयडीएफसीला निवेदन दिले होते. त्यानुसार या परिसरातील चरी बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी पाणीपुरवठा महामंडळाकडून काढून घेतल्यानंतर ती एलअॅण्डटीवर सोपविण्यात आली आहे. ज्या प्रभागामध्ये 24 तास पाणी योजना नाही, त्या प्रभागामध्ये पाणी पुरविण्यासाठी मुख्य जलवाहिनी घालण्यासह घरोघरी नळजोडणी करण्यासाठी दोन्ही बाजूला जलवाहिनी घातली जात आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. तर अद्याप काही ठिकाणी काम सुरू आहे. ज्या ठिकाणी जलवाहिनी घालण्यात आली आहे त्या ठिकाणी घरोघरी नळ कनेक्शन दिल्यानंतर चरी बुजविण्याचे काम हाती घेतले जात आहे.
प्रभाग क्र. 29 मध्ये उच्चभ्रू वस्ती आहे. जलवाहिनी घालण्यात आल्यानंतर चरी बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचा फटका पादचारी आणि वाहनचालकांना बसत होता. त्यामुळे तातडीने चरी बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीचे निवेदन नगरसेवक नितीन जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली एलअॅण्डटी आणि केयुआयडीएफसीकडे देण्यात आले होते. त्यानंतर चरी बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या चरी बुजविण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी नगरसेवक नितीन जाधव यांनी पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.