येळ्ळूर शिवारातील ‘त्या’ खड्ड्यांमध्ये माती टाकण्याचे काम सुरू
बेळगाव : उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी हलगा, शहापूर, येळ्ळूर शिवारातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता मोठमोठे खड्डे खोदून त्यामध्ये स्ट्रक्चर उभारले जात आहेत. हेस्कॉमच्या या मनमानी कारभाराबाबत शेतकऱ्यांतून विरोध व्यक्त होत आहे. त्याचबरोबर प्रसारमाध्यमातूनही टीकेची झोड उठविण्यात आल्याने हडबडलेल्या हेस्कॉमकडून स्ट्रक्चरसाठी खोदलेल्या खड्ड्यात जेसीबीच्या साहाय्याने माती करण्याचे काम गुरुवार दि. 16 रोजी हाती घेण्यात आले आहे.
हलगा ते मच्छे दरम्यानच्या शेतीपट्ट्यात वेगवेगळी पिके घेतली जातात. त्यामुळे बायपाससाठी पिकाऊ जमीन घेण्यात येऊ नये, यासाठी गेल्या पंधरा वषर्पांसून शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत बायपासचे काम केले जात आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता हलगा, शहापूर, येळ्ळूर शिवारातून उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी आठ ते दहा फुटांच्या आकारातील स्ट्रक्चर उभारण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून हेस्कॉमने हाती घेतले आहे.
कर्नाटक वीजपुरवठा मंडळाकडून हे काम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शेतांमध्ये रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. त्या पिकांचे नुकसान करत स्ट्रक्चर उभारण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना किंवा नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी जेसीबीच्या साहाय्याने खड्ड्यांमध्ये माती टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते.