काम व क्रोध मनुष्याचा नाश करणारे असल्याने त्यांना वश होऊ नये
अध्याय दुसरा
बाप्पा म्हणतात, कर्मयोगाचा जे आनादर करतात ते अमंगल विचारांनी घेरलेले असल्याने माझ्या विचारांची पायमल्ली करतात, ते महामुर्ख असतात. त्यांनी जाणूनबुजून माझ्याशी शत्रुत्व पुकारलेले असते. त्यामुळे ते नष्ट होतात. स्वत:च्या स्वभावात कोणतीही सुधारणा करण्याची इच्छा नसल्याने ते अहंकाराने व दुर्गुणांनी अधोगतीस्Aा जाऊन नाश पावतात. कुणालाही असे वाटेल की एव्हढे सर्वशक्तिमान असलेले बाप्पा अशा मुर्ख माणसांच्या बुद्धीत पालट घडवून आणून त्यांना कर्मयोगाचे आचरण का करायला लावत नाहीत. त्याचं उत्तर असं की, ज्ञानी मनुष्य जरी झाला तरी त्याच्या स्वभावानुसार कर्म करतो. म्हणून त्याला तू कर्मयोगाचे आचरण कर असा आग्रह करणे व्यर्थ होय. मात्र पूर्वकर्मसंयोगाने जर त्याची सद्गुरूंशी गाठ पडली तर मात्र ते त्याच्या स्वभावात त्यांच्या कृपेने शिष्याच्या कलाकलाने घेऊन त्याच्या स्वभावात बदल घडवून आणू शकतात.
सद्गुरूंचे महात्म्य सांगून झाल्यावर बाप्पा पुढील श्लोकात सांगतात की, इंद्रियांनी सुचवलेल्या विषयांचा माणसाला उपभोग घ्यायला न मिळाल्याने, त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या की, त्याला क्रोध येऊ लागतो.
कामश्चैव तथा क्रोध खानामर्थेषु जायते ।
नैतयोर्वश्यतां यायादस्य विध्वंसकौ यत ।। 34 ।।
अर्थ-काम तसाच क्रोध इंद्रियांच्या अर्थांचे ठिकाणी उत्पन्न होतो. हे काम व क्रोध मनुष्याचे नाश करणारे आहेत. त्यांना वश होऊ नये.
विवरण-मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असतो. त्यामुळे त्याला एखादी इच्छा झाली की ती लगेच पूर्ण व्हावी असे त्याला वाटत असते पण मुळात मनुष्य कर्ता नसल्याने त्याला झालेली इच्छा पूर्ण होणे न होणे हे ईश्वराच्या मर्जीवर अवलंबून असते. अर्थातच अज्ञानी माणसाच्या हे लक्षात येत नसल्याने त्याला इच्छा पूर्ण होत नाही असे दिसल्यास राग येऊ लागतो. त्याचबरोबर ज्याच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत त्याचा तो द्वेष करू लागतो. हे सगळं त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडल्याने घडत असते.
वास्तविक पाहता माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना, भेटणाऱ्या व्यक्ती आणि प्राप्त होणारी परिस्थिती हे सर्व त्याच्या पूर्वकर्मावर अवलंबून असते. ज्ञानी माणसाना हे माहित असते म्हणून ते आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून समाधानात राहतात पण अशी माणसे फारच थोडी म्हणजे लाखात एखादा असा असतो असे म्हंटले तरी चालेल. म्हणून बाप्पांना ह्या श्लोकात असं सांगायचं आहे की, एखादी इच्छा जर झाली तर माणसाने ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने शक्य असेल ते सर्व प्रयत्न करावेत आणि इच्छेचे पूर्ण होणे ईश्वराच्या मर्जीवर सोडून द्यावे. असा स्वभाव तयार झाला की, ज्ञानेन्द्राrयानी कितीही प्रलोभने दाखवली आणि काय वाटेल ते करून इच्छा पूर्ण करून घे असे बुद्धीने सुचवले तरी तो त्यांच्या आहारी न जाता इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने नितीन्यायानुसार करायचे ते सर्व प्रयत्न करून स्वस्थ राहील. त्याच्या ह्या स्वभावामुळे जर इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याला राग येणार नाही तसेच ज्यांची इच्छा पूर्ण झालेली दिसत आहे त्यांचा तो द्वेष करणार नाही. भगवंत गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणतात, ज्या माणसाला विषयांच्या उपभोगाचा नाद लागतो त्याला विषयांची अधिकाधिक ओढ वाटू लागते. जर विषय मिळाले नाहीत तर रागाने घेरला जातो. त्यामुळे त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडतो. रागाच्या भरात बुद्धी नष्ट होत असल्याने आपण काय करतोय ह्याचे त्याला भान रहात नाही आणि ह्यातच त्याचा आत्मनाश होतो. ह्याउलट जर त्याला आपण ईश्वरी अंश आहोत ह्याची आठवण झाली तर तो वेळीच सावरतो म्हणून माणसाने सतत ईश्वराचे स्मरण करावे.
क्रमश: