लग्नासाठी अद्भूत अटी
लग्न झाल्यानंतर पत्नीने पतीसह तिच्या सासरी, अर्थात पतीच्या घरी नांदावयास जायचे, ही भारताची परंपरा आहे. पतीच्या घरी त्याचे आईवडील, म्हणजेच नवपरिणित पत्नीचे सासू-सासरेही असण्याची शक्यता असते. विवाहानंतरचे आयुष्य पत्नीने या साऱ्यांसह व्यतीत करायचे असते. तथापि, आता काळ वेगळा आहे. कन्या एकुलती एक असेल, तर आपल्या लग्नानंतर आपले मातापिता आपल्यासमवेत असावेत असे तिला वाटते. त्यामुळे लग्नानंतर पतीने त्यांचे उत्तरदायित्व नाकारु नये, अशी पत्नीची अपेक्षा असेल तर ती रास्त मानली जाते.
पण समस्या तेव्हा निर्माण होते, ज्यावेळी पत्नी आपल्या मातापित्यांना आपल्यापाशी राहू देते, पण आपल्या सासू-सासऱ्यांना (पतीच्या मातापित्यांना) आपल्या एकत्र कुटुंबात ठेवून घेण्यास नकार देते. असाच एक प्रसंग सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. एका महिलेने विवाह वेबसाईटवर आपली एक जाहिरात प्रसिद्ध केली असून आपल्याशी विवाह करु इच्छिणाऱ्या पुरुषावर तिने अनेक विचित्र अटी घातल्या आहेत. ही महिला 39 वर्षांची असून घटस्फोटिता आहे. ती एका शाळेत शिक्षिका आहे. या महिलेला 34 ते 39 या वयोगटातील पती हवा आहे. इतकेच नव्हे, तर त्याचे उत्पन्न वर्षाला किमान 30 लाख रुपयांचे असले पाहिजे. पतीने आपल्याला चैनीच्या महागड्या वस्तू दिल्या पाहिजेत. तसेच जगप्रवास घडवून आणला पाहिजे. विवाहानंतर ती आपल्या मातापित्यांना स्वत:कडे ठेवणार आहे. कारण ते पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहेत. इथपर्यंतही सध्याच्या काळानुसार ठीक आहे. पण तिला तिचे भावी सासूसासरे तिच्या कुटुंबात नको आहेत, कारण तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर विश्वास नाही.
आता इतक्या अटी सोसून कोण तिच्याशी विवाह करणार, हा प्रश्नच आहे. तिने सध्या तिचे नाव गुप्त ठेवले आहे. पण तिच्या या सर्व अटी मान्य करुन जो तिच्याशी विवाहाला तयार आहे, त्याच्याकडून संदेश आल्यानंतर ती त्याला तिचे नाव सांगणार आहे. सोशल मिडियावर अनेकांनी या महिलेला ट्रोल केले असून अशी अटी असताना तिचे लग्न होणे अशक्य असल्याचे भाकित वर्तविले आहे. तथापि, तिची भाग्यरेषा बळकट असेल तर तिची इच्छा पूर्ण होईलही !