महिला विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
भारत व श्रीलंकेत होणार स्पर्धा : 30 सप्टेंबरपासून स्पर्धेला प्रारंभ
वृत्तसंस्था/ लंडन
आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंका या दोन देशात खेळवली जाणार आहे. सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेच्या तारखांची आणि ठिकाणांची घोषणा करण्यात आली.s या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून भारत आणि श्रीलंकेमधील 5 ठिकाणे सामन्यांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. ही स्पर्धा 30 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 2 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेतील सामन्यांसाठी भारतातील बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियम, गुवाहाटीमधील एसीए स्टेडियम, इंदूरमधील होळकर स्टेडियम, विशाखापट्टणम मधील स्टेडियम ही ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. तसेच श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियमवरही या स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत. भारतात 12 वर्षांनंतर महिला वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. पहिला सामना भारताचा बंगळुरूमध्ये खेळला जाईल. तसेच अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. उपांत्य फेरीतील पहिला सामना 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी किंवा कोलंबो येथे खेळवला जाणार आहे, तसेच दुसरा सामना बंगळुरूला 30 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी बंगळुरू किंवा कोलंबो येथे होईल.
स्पर्धेत आठ संघांचा सहभाग
वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 8 संघ पात्र ठरले आहेत. या 8 संघांमध्ये भारत, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया गतविजेता असल्याने त्यांच्यासमोर वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान असणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक 7 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2022 वर्ल्ड कप फायलनमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप ट्रॉफी राखण्यात यशस्वी होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.