महिलांच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना लॉर्ड्सवर
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीची महिलांची टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धा 2026 साली इंग्लंडमध्ये घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा पुढील वर्षीच्या 12 जूनपासून सुरू होणार असून या स्पर्धेत एकूण 12 संघांचा समावेश राहिल. या स्पर्धेतील अंतिम सामन्याचे यजमानपद लॉर्ड्स भूषविणार आहे.
2026 च्या महिलांच्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत एकूण 33 सामने खेळविले जाणार आहेत. तर अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर 5 जुलैला खेळविला जाईल. 2017 साली झालेल्या महिलांच्या वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याचे यजमानपद लॉर्ड्सने भूषविले होते. पुढील वर्षीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने सहा ठिकाणी आयोजित केले आहेत. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, द. आफ्रिका, विंडीज हे आठ संघ यापूर्वीच पात्र ठरले आहेत. दरम्यान, उर्वरित चार संघांसाठी आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक पात्र फेरीची स्पर्धा आयोजित केली आहे. 2020 साली झालेल्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मेलबर्नमध्ये खेळविला गेला. या अंतिम सामन्याला विक्रमी म्हणजे 86174 प्रेक्षकांची उपस्थिती होती.