महिला सराव सामने : भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया विजयी
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला येथे 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी काही सरावाचे सामने रविवारी खेळविण्यात आले. या सरावाच्या सामन्यात भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविला.
भारत आणि विंडीज यांच्यात झालेल्या सरावाच्या सामन्यात भारताने विंडीजचा 20 धावांनी पराभव केला. विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 141 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 8 बाद 121 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 20 धावांनी गमवावा लागला. भारताच्या डावामध्ये रॉड्रीग्ज आणि भाटीया यांनी 50 धावांची भागिदारी केली. भाटियाने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 25 चेंडूत 24 धावा तर रॉड्रीग्जने 40 चेंडूत 5 चौकारांसह 52 धावा जमविल्या. दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकर यांनी फटकेबाजी केल्याने भारताला 140 धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या कॅम्पबेलने 38 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. हेनरी समवेत कॅम्पबेलने 57 धावांची भागिदारी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी 7 चेंडूत 3 गडी बाद केल्याने विंडीजवर चांगलेच दडपण आले. विंडीजची स्थिती यावेळी 6 बाद 71 अशी केविलवाणी होती. हेनरीने एकाकी लढत देत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 48 चेंडूत नाबाद 59 धावा जमविल्या. पूजा वस्त्रकरने 20 धावांत 3 तर दिप्ती शर्माने 11 धावांत 2 तसेच शोभनाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धाफलक: भारत 20 षटकात 141 ( रॉड्रीग्ज 52, भाटिया 24, मॅथ्युज 4-17), विंडीज 20 षटकात 8 बाद 121 (हेनरी नाबाद 59, वस्त्रकर 3-20, दिप्ती शर्मा 2-11, शोभना 1-7)
न्यूझीलंड विजयी
दुसऱ्या एका सरावाच्या सामन्यात अॅमेलिया केरच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने द. आफ्रिकेचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर द. आफ्रिकेचा डाव 92 धावांत आटोपला. कर्णधार वूलव्हर्टने 37 चेंडूत 1 चौकारासह 33 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे अॅमेलिया केरने 13 धावांत 3 तर कास्पीरेकने 7 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 2 बाद 93 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला. सोफी डिव्हाईन आणि केर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 36 धावांची भागिदारी केली. केरने 37 चेंडूत 37 धावा जमविल्या. डिव्हाईनने 24 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 35 धावा केल्या.
संक्षिप्त धाफलक: द. आफ्रिका सर्वबाद 92 (वूलव्हर्ट 33, अॅमेलिया केर आणि कास्पीरेक प्रत्येकी 3 बळी), न्यूझीलंड 2 बाद 93 (डिव्हाईन नाबाद 35, केर 37, हॅलिडे नाबाद 6)
ऑस्ट्रेलिया विजय
तिसऱ्या सरावाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने अष्टपैलु कामगिरी करताना 30 चेंडूत 7 चौकारांसह 50 धावा जमविल्या. गार्डनरने 19 चेंडूत 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. मुनी बाद झाल्यानंतर मॅग्राने 22 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावा जमविल्याने ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 6 बाद 122 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या बाऊचेरने 17, हॉजने 7 तर अॅलिसी कॅप्सेने 34 चेंडूत 5 चौकारांसह 40, नॅट सिव्हेर ब्रंटने 12 धावा जमविताना कॅप्से समवेत 52 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे मॉलिन्युक्सने 27 धावांत 2 तर मॅग्राने 18 धावांत 3 गडी बाद केले. इंग्लंड संघाला विजयासाठी 34 धावांची जरुरी होती. पण त्यांना हे उद्दिष्ट गाठता आले नाही.