वर्षाखेरीस महिला संघ आफ्रिका दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ मुंबई
दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने या वर्षाच्या उत्तरार्धात भारत आणि ऑस्ट्रेलियासोबत मालिकांची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिकन महिला संघ यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका आणि एक कसोटी सामना खेळला जाईल. हा एकमेव कसोटी सामना 20 ते 23 डिसेंबर दरम्यान गकबेर्हा येथे खेळवला जाईल. तीन वनडे सामन्यांची मालिका 9 ते 15 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात 6 डिसेंबर रोजी होईल. भारतीय संघ बेनोनी येथे दक्षिण आफ्रिका इमर्जिंग संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर उभय संघात वनडे मालिका खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, वनडे मालिका संपल्यानंतर उभय संघात एकमेव कसोटी सामना होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये आतापर्यंत एकूण 3 कसोटी सामने झाले असून दोन्ही संघ चौथ्या कसोटी सामन्यात समोरासमोर भिडणार आहेत. टीम इंडियाचा दौरा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आफ्रिका दौऱ्यावर येणार आहे.
भारतीय महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक -
6 डिसेंबर - सराव सामना, बेनोनी
9 डिसेंबर - पहिला वनडे सामना, पोटचेफस्ट्रूम
12 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, ब्लोमफॉन्टेन
15 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, केप टाऊन
20 डिसेंबर ते 23 डिसेंबर - एकमेव कसोटी सामना, गकबेर्हा