म्युच्युअल फंडांमध्ये महिलांचा गुंतवणुकीतला वाटा वाढला
वृत्तसंस्था/ मुंबई
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये महिलांचा वाटा हा एक चतुर्थांश इतका (टक्केवारीत पाहता 25 टक्के)दिसून आला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहता महिला गुंतवणूकदारांची हिस्सेदारी एक तृतीयांश इतकी झाली आहे.
11.25 लाख कोटीची गुंतवणूक
म्हणजेच महिला या पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया व क्रिसिल यांच्या sताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. महिला गुंतवणूकदारांचे असेट अंडर मॅनेजमेंट मार्च 2019 मध्ये 4.59 लाख कोटी रुपये इतके होते जे वाढून मार्च 2024 मध्ये 11.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब समोर आली असून त्यामध्ये महिलांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक ही स्वतंत्रपणे केली आहे, हे विशेष. यामध्ये त्यांनी ब्रोकरची मदत घेतलेली नाही. म्हणजेच महिला या थेटपणे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सक्षम झाल्या आहेत.
25 ते 44 वयोगट आघाडीवर
प्रमाणामध्ये पाहता 25 ते 44 वयाच्या महिलांनी थेटपणे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असून त्यांचे प्रमाण 16 टक्याहून 27 टक्क्यांवर (2019 च्या तुलनेत)पोहोचले आहे. 58 वर्षे वयापेक्षा जास्त महिलांचे प्रमाण 13 टक्यांवरुन 17 टक्क्यांवर पोहोचले.
एसआयपीत वाटा
मार्च 2024 मध्ये महिलांची एकंदर गुंतवणुकीमध्ये एसआयपीची हिस्सेदारी 30 टक्केहून अधिक होती. मार्च 2019 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये पाहता ही वाढ 319 टक्के इतकी विक्रमी दिसून आली. डिसेंबर 2020 मध्ये 71.13 लाख इतकी महिलांची असणारी एसआयपी खाती वाढून डिसेंबर 2024 मध्ये 2.63 कोटी इतकी झाली. एसआयपी खात्यांच्या संख्येमध्ये या चार वर्षाच्या कालावधीत पाहता विक्रमी 270 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.