शहर पोलीस ठाण्यात 'महिला राज’
सातारा :
चूल आणि मूल ही चार भिंतीतली महिला आता पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात दिसू लागली आहे. अगदी कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलात ही महिला मोठ्या पदावर काम करतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने सकाळी एकच लगबग पहायला मिळत होती. सकाळी 9 वाजता पोलीस ठाण्यातल्या कर्मच्रायांची नित्यनेमाने हजेरी घेतली जाते. त्याच वेळी सर्व महिला कर्मचारी या भगव्या फेट्यात हजर होत्या. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्याचा कारभार महिला कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. विशेष म्हणजे एकही मोठ्या गुह्याची नोंद पोलीस दप्तरी झाली नाही.
राजधानी सातारा जिह्यातून अनेक महिला स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेल्या आणि त्यानंतरही. त्यापैकी सावित्रीबाई फुले याही एक. आज शिक्षणामुळे राजकीय, नोकरी, सामाजिक या सर्वच ठिकाणी महिला पहायला मिळतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक वेगळा अनोखा उपक्रम राबविण्याचे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी ठरवले. त्यानुसार सकाळी 9 वाजल्यापासून पोलीस ठाण्यात अगदी हजेरी घेण्यापासूनची कामे महिला कर्मचारी करत होत्या. अगोदर सत्कार सोहळा पार पडला. त्यानंतर रुटीन वर्क सुरू झाले. काही मिनिटात प्रत्येक महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामध्ये 75 महिला कर्मचाऱ्यांनी पूर्ण पोलीस ठाण्याचे कामकाज दिवसभर पाहिले.
महिला दिनाचे औचित्याने प्रभारी अधिकारी राजेंद्र मस्के यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांच्याकडे दिला. तसेच पोलीस ठाणेस डे ऑफिसर म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक रुचिता जयस्वाल, ठाणे अंमलदार म्हणून महिला सहायक फौजदार श्रीमती अनबुले, सीसीटीएनएस/रोटेशन करीता म. पो. कॉ. फाळके, शिंदे, कलगुटकी, देशमुख, धारेराव, शेवाळे, जुंजार, भोसले, शिंगाडे यांनी तसेच हजेरी मेजर म्हणून म. पो. हवा. शिंदे, कोर्ट पैरवी म्हणून म.पो. हवा. जायकर, देखणे तसेच क्राईम कामकाज म.पो.कॉ. प्रियांका धनावडे, कारकून कामकाज म.पो.कॉ. ज्योती गोळे तसेच गोपनीय कामकाज म. पो. कॉ. कोमल गोडसे, बारनिशी कामकाज म. पो. कॉ. पुजा शिंदे, गार्ड अंमलदार म्हणून म.पो. हवा. बेंद्रे, खरात यांनी कामकाज पाहिले आहे.
पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रविवार पेठ चौकी, सदरबझार पोलीस चौकी, गोडोली चौकी, एमआयडीसी चौकी, माहुली चौकी, एस.टी. स्टॅण्ड पोलीस चौकी, येथे देखील महिला पो. हवा. अर्चना कदम, रेणुका सावंत, अश्विनी बनसोडे, निलम सुर्यवंशी, शितल सपकाळ, अर्चना सुडके, अर्चना पवार, बोराटे, पोतेकर, वाहतुक नियत्रंण कामकाज म. पो. हवा. गौरी ढाणे, राणी मोहिते यांनी पाहिलेले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे गहाळ चोरीस गेलेले 4 लाख रुपये किंमतीचे एकूण 20 मोबाईल हॅण्डसेट तक्रारदार महिलांना सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्रीमती अक्षदा इंगळे यांच्या हस्ते परत दिले आहे. हा महिला दिन पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आला आहे.
- दिवसभरात एकही मोठ्या गुन्ह्याची नोंद नाही
सातारा शहर पोलीस ठाणे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस चौक्यात महिला कारभारी होत्या. दिवसभर एकही मोठ्या गुन्हा नोंद झाला नसून एक किरकोळ अपघात फक्त पोलीस ठाण्याच्या समोर दुपारी रॅली जात असताना झाल्याचे समजते. त्याची नोंद झाली नव्हती.