दिल्लीत ‘महिला समृद्धी योजने’चा प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पात्र महिलांना प्रतिमहिना 2 हजार 500 रुपये मानधन देण्याची, महिला समृद्धी योजना दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने क्रियान्वित केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दिल्लीतील महिलांना ही जणू भेटच दिल्ली सरकारने दिली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेचा शुभारंभ केला असून या कार्यक्रमाला त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
आपले सरकार दिल्लीत असल्यास पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येक महिन्याला 2 हजार 500 कोटी रुपये जमा केले जातील, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दिल्लीतील 70 पैकी 48 जागा मिळून दोन तृतीयांश बहुमताची प्राप्ती झाली. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली. त्यांनी आता हे प्रथम आश्वासन पूर्ण केले आहे.