महिला प्रीमियर लीग आजपासून, मुंबई-आरसीबी सलामीचा सामना
हरमनप्रीत सिंगच्या मुंबई इंडियन्स संघाचे तिसऱ्या डब्ल्यूपीएल विजेतेपदाचे ध्येय, स्मृती मानधनाचा आरसीबी आणि जेमिमा रॉड्रिग्सचा दिल्ली कॅपिटल्स संघही शर्यतीत
वृत्तसंस्था/नवी मुंबइं
पहिल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक जेतेपदाच्या वैभवात रमलेल्या भारताच्या उत्साही महिला क्रिकेटपटू आज शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या चौथ्या महिला प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार असून त्यातून या वर्षी होणार असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या त्यांच्या तयारीलाही सुऊवात होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील दोन वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ ‘डब्ल्यूपीएल’मधील एकमेव अन्य विजेता संघ असलेल्या स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी ‘भारतीय महिला क्रिकेटचे माहेरघर’ असलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भिडणार आहेत. चौथी डब्ल्यूपीएल स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा येथे दोन टप्प्यांत आयोजित केली जाईल, ज्यामुळे जगभरातील खेळाडूंना सर्वोत्तम खेळाडूंविऊद्ध खेळण्याची आणि जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची आपली तयारी अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाकडे कागदावर सर्वोत्तम संघ आहे, ज्यात इंग्लंड (नॅट सायव्हर-ब्रंट) आणि वेस्ट इंडिज (हेली मॅथ्यूज) संघांच्या कर्णधारांचा समावेश आहे. आपल्या संघातील बहुतेक खेळाडूंना कायम ठेवल्यामुळे मुंबईचा संघ हा हरवण्यास कठीण संघ असेल. कारण न्यूझीलंडची अमेलिया केर, आशादायक ऑस्ट्रेलियन मिली इलिंगवर्थ आणि भारताची विश्वासार्ह अमनजोत कौर यांच्यामुळे त्यांची फलंदाजी मजबूत झाली आहे. त्याशिवाय वरच्या फळीत जी. कमलिनीचा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध प्रतिभेमुळे मुंबई संघाला खेळाडूंच्या निवडीच्या बाबतीत डोकेदुखीही होऊ शकते. शबनिम इस्माईल त्यांच्या माऱ्याचे नेतृत्व करेल, ज्यात सायका इशाकचाही समावेश आहे. सायकाने 2023 मधील प्रभावी पदार्पणानंतर काही हंगाम कठीण गेल्यावर आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
दुसरीकडे, मेग लॅनिंग यूपी वॉरियर्स संघात गेल्यामुळे भारताची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सने दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा सांभाळली आहे. या संघावर तिन्ही वेळा अंतिम फेरीत पराभूत झाल्याचा भार असेल. कॅपिटल्सकडे एक धोकादायक संघ आहे आणि जर सर्व गोष्टी जुळून आल्या, तर हा संघ विजेतेपद पटकावू शकतो. भारतीय खेळाडूंचा विचार करता दिल्ली संघात विश्वचषक विजेत्या संघातील फॉर्मात असलेल्या सलामीवीर शफाली वर्मा, स्नेह राणा आणि श्री चरणी यांचा समावेश आहे. अन्य देशी प्रतिभांमध्ये निकी प्रसाद, भारतीय खेळाडू मिन्नू मणी आणि उजव्या हाताची वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा यांचा समावेश आहे, जी या संघातील एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे. दिल्लीचा परदेशी खेळाडूंचा गटही प्रभावी आहे, ज्यात एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील सर्वोत्तम फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. मारिझान कॅप आणि अलाना किंग गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील, परंतु अॅनाबेल सदरलँडच्या माघारीमुळे संघाची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे.
दिग्गज एलिस पेरीच्या अनुपस्थितीत स्मृती मानधना आरसीबी संघाला कशी पुढे नेते आणि सलामीला धावा कशा जमवते यावर बरेच काही अवलंबून असेल. मानधनाचा फॉर्म ही कधीच चिंतेची बाब नसते आणि 2024 च्या विजेत्या संघात असलेल्या प्रतिभावान खेळाडूंमुळे तिला आत्मविश्वास वाटेल. ऑस्ट्रेलियाची फलंदाज जॉर्जिया व्होल, अष्टपैलू ग्रेस हॅरिस आणि दक्षिण आफ्रिकेची धडाकेबाज अष्टपैलू नादिन डी क्लर्क फलंदाजीची जबाबदारी वाटून घेतील. यष्टीरक्षणाची आणि फिनिशिंगची जबाबदारी आरसीबीकडे असलेल्या स्फोटक रिचा घोषवर असेल. भारताच्या अऊंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार आणि इंग्लंडची लॉरेन बेल या आरसीबीच्या प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. तसेच त्यांच्याकडे इंग्लंडची लिन्सी स्मिथ, भारताची राधा यादव आणि श्रेयांका पाटील यांच्यासारख्या दर्जेदार फिरकी गोलंदाजही आहेत.
दोन सामान्य हंगामानंतर गुजरात जायंट्सने गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते आणि या वर्षी ते आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. परंतु अॅश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखालील संघाला परदेशी खेळाडूंवरच अधिक अवलंबून राहावे लागेल, कारण त्यांच्या संघात एकही आघाडीची भारतीय फलंदाज नाही. रेणुका सिंह ठाकुर ही संघातील सर्वात मोठी भारतीय स्टार आहे. तिच्यासोबत तितास साधू आणि राजेश्वरी गायकवाड आहेत, तर दुखापतीनंतर पुनरागमन करणारी यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया दमदार कामगिरीच्या शोधात आहे. तथापि, संघाकडे गार्डनरच्या रुपाने दमदार कर्णधार आहे आणि तिच्यासोबत इतर काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंही आहेत. यष्टीरक्षणाची आणि सलामीची जबाबदारी बेथ मुनीवर असेल, तर गेल्या वर्षी स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेली दिग्गज सोफी डिव्हाईन या वर्षी पुन्हा डब्ल्यूपीएलमध्ये परतली आहे. ऑस्ट्रेलियन किम गार्थ ही रेणुका आणि काश्वी गौतमसोबत नवीन चेंडूची जबाबदारी सांभाळू शकते, तर फिरकी गोलंदाजीचे पर्याय म्हणून त्यांच्याकडे जॉर्जिया वेअरहॅम, गायकवाड आणि तनुजा कंवर या खेळाडू उपलब्ध आहेत. संपूर्ण संघात मोठे बदल केलेल्या यूपी
वॉरियर्सने कर्णधार म्हणून मेग लॅनिंगची योग्य निवड केली आहे, परंतु उत्तर प्रदेशच्या शिप्रा गिरीशिवाय त्यांच्याकडे दुसरी कोणताही खास यष्टीरक्षक नाही. अव्वल स्थानावर असलेल्या फोबी लिचफिल्डमुळे वॉरियर्स संघाला फिटनेस ठीक असल्यास भारताच्या प्रतीका रावलला तिच्यासोबत किंवा धोकादायक किरण नवगिरेला सलामीला पाठवण्याचा पर्याय मिळतो. हरलीन देओल आणि लॅनिंग मधली फळी सांभाळू शकतात, परंतु मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या नेतृत्वाखालील वॉरियर्सच्या रणनीतीकारांना एका फिनिशरचा शोध असेल. अशा परिस्थितीत अष्टपैलू खेळाडूंपैकी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू दीप्ती शर्मा, क्लो ट्रायॉन, धोकादायक डियांड्रा डॉटिन आणि भारताची शिखा पांडे यांना दुहेरी भूमिका बजावावी लागेल. भारताची क्रांती गौड आणि इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असतील. परंतु वॉरियर्सने काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणेही उपयुक्त ठरेल.
सामन्याची वेळ : सायं. 7.30,प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क