विश्वचषकाच्या तयारीसाठी महिला हॉकी संघाचे युरोपला प्रयाण
वृत्तसंस्था, जर्मनी
भारतीय महिला हॉकी संघ बुधवारी जर्मनीतील फ्रँकफर्टसाठी रवाना झाला. तिथे हा संघ नेदरलँड्स आणि बेल्जियम यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या आगामी एफआयएच विश्वचषकासाठी तयारीचा अंतिम टप्पा पूर्ण करेल. फ्रँकफर्टला प्रयाण करण्यापूर्वी संघाने बेंगळूर ते मुंबई असा प्रवास केला.
युरोपमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि खेळातील विविध बाबींना अधिक अचूक करण्यासाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराव्यतिरिक्त, भारतीय संघ जर्मनीविरुद्ध 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी दोन सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर नेदरलँड्समध्ये विश्वचषकाची तयारी पुढे चालू ठेवण्यासाठी संघ 2 ऑगस्ट रोजी अॅमस्टरडॅमकडे रवाना होईल. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी चीनविरुद्धच्या सामन्याने करेल आणि त्यानंतर पूल डी मध्ये दक्षिण आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध सामने खेळेल. 15 ते 30 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास भारताची कर्णधार सलिमा टेटे हिने व्यक्त केला.
संपूर्ण संघ पुढील आव्हानासाठी सज्ज आहे. आमचा सराव चांगला झाला आहे आणि आता तोच वेग सराव सामन्यांमध्ये आणि त्यानंतर विश्वचषकातही कायम राखणे महत्त्वाचे आहे, असे टेटे संघ रवाना होण्यापूर्वी म्हणाली. पहिल्याच सामन्यात चीनचा सामना करणे ही एक महत्त्वाची परीक्षा असेल आणि आम्हाला स्पर्धेची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करायची आहे. एक संघ म्हणून, आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करण्यास आणि देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करण्यास कटिबद्ध आहोत.