ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महिला हॉकी संघ जाहीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
26 एप्रिल ते 4 मे दरम्यान आयोजित केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने सोमवारी 26 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली असून त्यामध्ये पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय महिला संघ 5 सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील सर्व म्हणजे पाचही सामने पर्थच्या हॉकी स्टेडियमवर खेळविले जातील. भारतीय महिला हॉकी संघामध्ये ज्योती सिंग, सुजाता कुजूर, अजमिना कुजूर, पूजा यादव आणि माहीमा टेटे या पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
या दौऱ्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे पहिले दोन सामने ऑस्ट्रेलिया अ संघाबरोबर होणार आहेत. त्यानंतरचे तीन सामने ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला संघाबरोबर खेळविले जातील. 2024-25 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग युरोपियन टप्प्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाकरिता हा दौरा सरावाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. ही स्पर्धा येत्या जूनमध्ये खेळविली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय महिला हॉकी संघ हा युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समिश्र असा आहे. या संघाचे नेतृत्व मध्यफळीत खेळणारी सलिमा टेटेकडे सोपविण्यात आले आहे. नवनीत कौर उपकर्णधार म्हणून राहिल. सविता आणि बिचु देवी खरीबाम यांच्यावर गोलरक्षणाची जबाबदारी राहिल. बचावफळीमध्ये आता ज्योती सिंग, सुजाता कुजूर, अजमिना कुजूर, सुशिला छानु, इशिका चौधरी यांचा समावेश राहिल. कर्णधार सलिमा टेटे तसेच नवोदित माहिमा टेटे आणि पूजा यादव यांच्यावर मध्यफळीची जबाबदारी राहिल. आघाडीफळीमध्ये नवनीत कौर, दीपिका, मुमताज खान, ऋतुजा पिसाळ तसेच दीपिका सोरेंग आणि ब्युटी डुंगडूंग यांचा समावेश राहिल.