महिलांसाठीच्या जिमचे आज उद्घाटन
तैवानहून मागविलेली आधुनिक व्यायामाची उपकरणे : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
बेळगाव : आपला भवताल किंवा वातावरण हे महिलांसाठी सुरक्षित राहिले नाही. आजही सायंकाळनंतर महिला सुरक्षितपणे वावरू शकतील, याची खात्री देता येत नाही. बदलापूर आणि कोलकाता येथील घटना पाहिल्यानंतर मुलींचे पालक धास्तावले आहेत. परंतु, केवळ भीती बाळगून चालणार नाही तर त्यावर उपायही शोधणे आवश्यक आहे. मुली किंवा महिला या नाजूक चणीच्या असतात, असे म्हटले जाते. परंतु, आता मुलीसुद्धा आजपर्यंत पुरुषांचेच वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये प्रवेश करून कर्तृत्व गाजवत आहेत. खेळामध्ये चमकत आहेत. स्वत:चे शरीर सुदृढ आणि फिट ठेवणे याचे महत्त्व त्यांनाही समजले आहे. याशिवाय त्या स्वसंरक्षणाचे धडेही गिरवू लागल्या आहेत.
हेच लक्षात घेऊन मराठा कॉलनी येथील राज के. पुरोहित यांनी नवरात्रीचे औचित्य साधून फक्त महिला आणि मुलींसाठी जिम सुरू केली आहे. याचे उद्घाटन शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 9.30 वाजता महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार आहे. आज शहरामध्ये अनेक जिम आहेत. परंतु, ही जिम फक्त महिला आणि मुलींसाठीच असणार आहे. विशेष म्हणजे महिलांना घरातील सर्व कामे आवरून फक्त दुपारी काहीसा वेळ मिळतो. तसेच नोकरदार महिलांना लंच अवरमध्ये थोडा मोकळा वेळ मिळतो, हे लक्षात घेऊन सकाळी 6 ते सायंकाळी 7 ही जिमची वेळ ठरविण्यात आली आहे.
या जिममध्ये तैवानहून अत्यंत आधुनिक अशी व्यायामाची आणि जिमची उपकरणे मागविण्यात आली आहेत. याशिवाय झुंबा आणि योगा याचे वर्गही असणार आहेत. जिम सकाळी 6 पासून संध्याकाळी 7 पर्यंत खुले असले तरी झुंबा आणि योगासाठी वेगवेगळ्या बॅच आहेत. उद्घाटनाचे औचित्य लक्षात घेऊन जिमचे संचालक राज के. पुरोहित यांनी प्रथम नावनोंदणी करणाऱ्या 50 सदस्यांना तीन महिने विनाशुल्क जिमचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच एकूण त्यांना पंधरा महिने प्रशिक्षण मिळू शकते. स्वसंरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन याबाबत जिमतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ती पूर्णत: विनामूल्य असून त्यासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. जिममध्ये डाएटबद्दल मार्गदर्शन मिळू शकेल. तसेच महिला व मुलींना शिकविण्यासाठी महिला प्रशिक्षकच असणार आहेत, हे विशेष होय.