For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्वशक्ती’कडून महिला दिन साजरा

11:17 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘स्वशक्ती’कडून महिला दिन साजरा
Advertisement

केएलई कन्व्हेन्शन केंद्रात कार्यक्रम : स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण

Advertisement

बेळगाव : केएलईच्या स्वशक्ती सबलीकरण कक्षाकडून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्त पक्षाने एका जल्लोषपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केएलई कन्व्हेन्शन केंद्रात केले होते. ‘अॅक्सिलरेटेड अॅक्शन फॉर जेंडर इक्वॅलिटी’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. या उद्बोधक कार्यक्रमाला अनेक संस्थांच्या शिक्षक आणि विद्यार्थिनींनी मोठी उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमाला भारतातील प्रथम महिला ‘ब्लेड रनर’ शालिनी सरस्वती प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होत्या. त्यांनी 2023 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरागेम्समध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी आशियातील सर्वात वेगवान महिला ब्लेड रनर म्हणून या स्पर्धेत विक्रम प्रस्थापित केला आहे.

प्रेरणादायी अनुभवांचे कथन

Advertisement

शालिनी यांनी या कार्यक्रमात त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा पट उलगडून दाखविला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित श्रोते भारावून गेले होते. त्यांच्या भाषणामुळे श्रोत्यांना स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने कार्यरत होण्यासाठी उत्साह मिळाला. महिलांनी सहनशक्ती, चिकाटी, आत्मविश्वास आणि साहस दाखविल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात यशाची शिखरे गाठू शकतात, हा मंत्र त्यांनी दिला. साहस आणि सातत्य हे यशाचे दोन स्तंभ आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमात स्वशक्ती कक्षाच्या सचिव डॉ. नेहा धडेद यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्य समन्वयक डॉ. प्रीती के. दोडवाड यांनी अन्य सहकाऱ्यांसह प्रमुख अतिथींचा सत्कार केला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रील मेकिंग आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्वशक्ती महिला कक्षाच्या सहसचिव डॉ. प्रीती हजारे यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Advertisement
Tags :

.