महिला आशिया चषक : आज भारताचा मुकाबला हाँगकाँगशी
वृत्तसंस्था/दुबई
महिला टी-20 आशिया चषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात आज गुऊवारी हाँगकाँगचा सामना करताना अधिक प्रभावी कामगिरीसाठी भारताला आपल्या फलंदाजीतील त्रुटी दूर कराव्या लागतील. एकदिवसीय प्रकारात चार आणि टी-20 प्रकारात तीन वेळा आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला थायलंडविऊद्धच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी कोसळल्यामुळे काही काळ तणावाचा सामना करावा लागला होता. 10 षटकांत 2 बाद 101 धावांवर असताना भारत 200 हून अधिक धावांच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र त्यानंतर अवघ्या 29 धावांत सात गडी गमावल्यामुळे त्यांना 159 धावांवर समाधान मानावे लागले.
भारताने थायलंडचा 94 धावांनी सहज पराभव केल्यामुळे या पडझडीचा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला नाही, तरीही या घटनेमुळे आत्मपरीक्षण करणे गरजेचे ठरले आहे. कारण एखाद्या बलाढ्या संघाविऊद्ध अशी चूक महागात पडू शकते. मात्र हाँगकाँग हा तुलनेने कमकुवत संघ असल्याने पाकिस्तानविऊद्धच्या ‘गट अ’मधील शेवटच्या सामन्यासारख्या मोठ्या आव्हानांपूर्वी आपल्या उणिवा दूर करण्यासाठी भारताला पुरेसा वाव मिळेल. भारतासाठी शफाली वर्माने वेगवान 64 धावांची खेळी करत चमकदार कामगिरी केली, तर दीप्ती शर्मानेही आपली क्षमता सिद्ध केली.
तिने एकही धाव न देता तीन बळी टिपले आणि महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. मात्र दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी संघात स्थान मिळालेली प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांना मिळालेल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करून चांगली कामगिरी करण्याची आशा असेल. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही धावांच्या मार्गावर परतण्याची इच्छा असेल, जेणेकरून टी-20 सारख्या सर्वांत छोट्या प्रकारातील तिचा फॉर्म आणि भविष्याबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देता येतील.
आशिया चषकानंतर भारत जपानमधील आशियाई क्रीडास्पर्धेत सहभागी होणार आहे. टी-20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर त्या स्पर्धेपूर्वी भारताला सर्वोत्तम लयीत असणे गरजेचे आहे. दुसरीकडे, स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँगला थायलंडकडून अवघ्या सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 121 धावांचा पाठलाग करताना त्यांना 7 बाद 114 धावांपर्यंतच मजल मारता आली. तरीही त्यांच्या गोलंदाजी विभागाने जबरदस्त जिद्द दाखवली. विशेषत: वेगवान गोलंदाज मरीना
लॅम्पलफ हिने 4 बळींसाठी केवळ 11 धावा देत उत्कृष्ट कामगिरी केली. जर हाँगकाँगला कडवी झुंज द्यायची असेल तर भारताच्या आक्रमक फलंदाजी फळीला रोखण्याचा मार्ग मरीनाला शोधावा लागेल. कॅरी चॅन ही आणखी एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. तिने पहिल्या सामन्यात 20 चेंडूंत 28 धावांची जलद खेळी करत आपली जिद्द दाखवून दिलेली आहे आणि तिला आता मधल्या फळीची धुरा सांभाळावी लागेल.