महिलांची आशिया चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ राजगीर (बिहार)
येथे सोमवारपासून महिलांच्या आशिया चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. यजमान भारतीय महिला हॉकी संघाचा सलामीचा सामना मलेशियाबरोबर खेळविला जाणार आहे.
2024 च्या संपूर्ण वर्षभरात विविध स्पर्धांमधील सामने जिंकण्यासाठी झगडत असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या नव्या ऑलिम्पिक सायकलला प्रारंभ होत आहे. भारतीय महिला संघ हा आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा विजेतेपद मिळविले आहे. 2016 साली सिंगापूरमध्ये तर 2023 साली रांचीत झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिला संघाने अजिंक्यपद पटकाविले होते. दरम्यान भारतीय महिला हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. महिलांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने 13 सामने गमविले असून केवळ 2 सामने जिंकले तर 1 सामना बरोबरीत राखला आहे.
आशिया चॅम्पियन्स करंड हॉकी स्पर्धेसाठी सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेला भारतीय महिला हॉकी संघ हा अनुभवी आणि युवा खेळाडुंच्या सहभागाने संमिश्र असा आहे. नवनीत कौरकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये अन्य पाच देशांचा समावेश आहे. विद्यमान ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंड यांच्याकडून भारतीय महिला संघाला कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. भारतीय महिला संघाच्या बचाव फळीची भिस्त प्रामुख्याने उदिता, ज्योती, इषिका चौधरी, सुशिला चानू, वैष्णवी फाळके यांच्यावर राहिल. मध्यफळीमध्ये कर्णधार सलिमा टेटेला नेहा, शर्मिलादेवी, मनिषा चौहान, सुनेलिता टोप्पो आणि लालरेमसियामी यांची साथ मिळेल. नवनीत कौर, संगीता कुमारी, दिपीका, प्रीती दुबे आणि ब्युटी डुंगडुंग हे आघाडी फळी सांभांळतील, अनुभवी आणि माजी कर्णधार सविताकडे गोलरक्षणाची जबाबदारी राहिल.
सोमवारी भारत आणि मलेशिया यांच्यात सलामीचा सामना होणार असून त्यानंतर जपान व दक्षिण कोरिया तसेच चीन आणि थायलंड यांच्यात सामने खेळविले जातील. या सामन्यांच्या वेळापत्रकात थोडा फेरबदल करण्यात आला आहे. पहिला सामना दुपारी 12.15 वाजता, दुसरा सामना 2.30 वाजता तर तिसरा सामना 4.45 वाजता खेळविला जाईल.