पुरुषांच्या बरोबरीने महिलांची कर्तृत्व भरारी
लोकमान्यच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी यांचे गौरवोद्गार : बांद्यात ‘लोकमान्य उन्नती’ उपक्रम
बांदा : मोबाईलच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस सायबर क्राईमचे वेगवेगळे प्रकार आपण दरदिवशी पाहतोय. मुलांना गप्प राहण्यासाठी त्यांच्या हातात आम्ही मोबाईल देतो. त्यांच्या हातूनही असे गुन्हे घडतात. तसेच याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. त्यामुळे ‘पेरेंटल लॉक’ लावून मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. आज महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. अगदी पुरुषांच्या बरोबरीने ती काम करत आहे. त्यामुळे महिलांनी वेळेला महत्त्व द्यावे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही, असे प्रतिपादन लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी आणि ‘तरुण भारत संवाद’च्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी यांनी येथे केले. येथील आनंदी मंगल कार्यालयात महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे ‘लोकमान्य उन्नती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांसाठी सायबर गुन्हे जागरुकता व्याख्यान, महिला सक्षमीकरण, कायदेविषयक मार्गदर्शन, ‘खेळ पैठणीचा’ असे कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी सई ठाकुर-बिजलानी बोलत होत्या. व्यासपीठावर लोकमान्यचे क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब पांडव, पोलीस कॉन्स्टेबल गायत्री गोसावी, बचतगटाच्या वैशाली पै, शिल्पा सावंत आदी उपस्थित होत्या.
तेव्हाचे दिवस आठवा!
सई ठाकुर-बिजलानी पुढे म्हणाल्या, सततच्या मोबाईल वापरामुळे आपली पेशन्स लेव्हल कमी होत चालली आहे. दर दोन मिनिटाला आपण मोबाईलकडे बघत असतो. आपली कामे करून घेण्यासाठी मुलांकडे मोबाईल देतो. त्यामुळे त्यांच्या शाळेतील तक्रारी वाढत चालल्या आहेत. ज्यावेळी आपल्याकडे मोबाईल नव्हते ते दिवस आठवा. त्यावेळी आपण जास्तीत जास्त वेळ मुलांना देत होतो. मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारत होतो. त्यांच्याकडे ये-जा करत होतो. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. सर्वजण रिल पाहण्यात व्यस्त आहेत. त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होत आहे. मुले स्वत: खेळायला जात नाहीत. त्यांना मोबाईलपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सायबर गुन्हेदेखील कमी होतील.
प्रास्ताविक लोकमान्य सोसायटीच्या बांदा शाखा व्यवस्थापिका पल्लवी खानविलकर यांनी केले. क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब पांडव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी लोकमान्यच्या पल्लवी खानविलकर, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, महेश तानावडे, सिनिअर मॅनेजर शशांक विचारे, अर्चना सरनाईक आदी उपस्थित होत्या. संचालिका सई ठाकुर-बिजलानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैशाली पै, शिल्पा सावंत यांचा सई ठाकुर-बिजलानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गायक समीर चराटकर यांचाही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनुजा कुडतरकर यांनी केले. यावेळी समीर चराटकर यांचा गायनाचा कार्यक्रम झाला.
विचारपूर्वक गुंतवणूक करा!
तुम्ही विचार करून गुंतवणूक करा. त्या कंपनीची ऐपत बघा. त्या ठिकाणी असणारे लोक कोण आहेत, ते बघून तुमचे प्रश्न विचारून, शंका निरसन करून त्या ठिकाणी गुंतवणूक करा. कारण तुम्ही तुमचा कष्टाचा पैसा गुंतवणूक करत असताना त्याची सुरक्षितता तेवढीच गरजेची आहे, असे सई ठाकुर-बिजलानी म्हणाल्या. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गायत्री गोसावी यांनी सायबर क्राईमवर मार्गदर्शन केले.