वटपौर्णिमेनिमित्त खरेदीसाठी महिलांची बाजारात गर्दी
बेळगाव : वटपौर्णिमा सणानिमित्त रविवारी बेळगाव बाजारात खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती. पूजेचे साहित्य, फळे, फुले यांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होती. वटपौर्णिमेदिवशी उपवास असल्याने उपवासाचे पदार्थ विक्रीसाठी जागोजागी दाखल झाले आहेत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमा साजरी करतात. यावर्षी मंगळवार दि. 10 रोजी वटपौर्णिमा साजरी होणार आहे. नोकरदार तसेच कामगार महिलांना सोमवारी खरेदीसाठी वेळ मिळणार नसल्याने त्यांनी रविवारीच खरेदीसाठी गर्दी केली होती. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली या परिसरात फळे तसेच पूजेचे साहित्य विक्री केले जात होते. आंबा, जांभूळ, फणस, केळी, अननस यासह इतर फळे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. त्याचबरोबर पूजेचे साहित्य विक्री केले जात आहे. नवविवाहितांची साड्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले.