महिलांनी साहित्यातून सकारात्मक दिशा द्यावी!
डॉ.संगीता बर्वे यांचे आवाहन : महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन
फोंडा : महिलांनी आपल्यामधील निर्मिती क्षमता व कौशल्ये ओळखून त्यांना सकात्मक विचारातून दिशा द्यायला शिकले पाहिजे. कुठलीही चांगली गोष्ट मुळात छोटी किंवा कमी महत्त्वाची नसते. कवयित्री व लेखिका म्हणून आपली जडणघडण अशा छोट्या गोष्टीमधूनच होत गेली. गृहिणी म्हणून जगताना स्त्रीयांनी आपल्या आत्मानुभवांना एखादी आवडीची कला किंवा साहित्यकृतीतून वाट कऊन द्यावी, असे आवाहन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. संगीता बर्वे यांनी केले.
श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था, फोंडातर्फे आयोजित केलेल्या 18 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. ढवळी-फोंडा येथील भास्कर सभागृहात रविवारी हे एकदिवशीय संमेलन उत्साहात पार पडले. ज्येष्ठ गोमंतकीय लेखिका मीना समुद्र यांच्याहस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे, स्वागताध्यक्ष पल्लवी धेंपे, संमेलनाच्या कार्याध्यक्ष डॉ. विद्या प्रभूदेसाई, संस्थेच्या अध्यक्ष सुषमा तिळवे, व कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संगीता बर्वे यांनी काव्य व साहित्य निर्मितीमागील प्रेरणा सांगताना, जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीतून आलेले अनुभव लेखनासाठी खरी शिदोरी असल्याचे सांगितले. गृहिणी म्हणून जगताना व संवेदनशिल लेखिका म्हणून घडतानाचे काही अनुभव व त्यातून निर्माण झालेल्या काही कविता त्यांनी श्रोत्यांसमोर सादर केल्या. ‘मी हरवले आहे... मी हरवले आहे...उष्टावलेल्या कपांच्या विखुरलेल्या पसाऱ्यात कोंबून ठेवलेल्या कपड्यांच्या ढिगाऱ्यात, तार स्वरांच्या किंचाळणाऱ्या पोरीच्या बाळभुकेत मी हरवली आहे’ अशी स्त्री जीवनाचा वेध घेणारी कविता त्यांनी सादर केली.
मीना समुद्र म्हणाल्या, साहित्याची अभिऊची बाळगणाऱ्या महिलांसाठी हे संमेलन म्हणजे दिवाळीपूर्वीची दिवाळी आहे. मराठी भाषेला लाभलेला अभिजाततेचा दर्जा हा अपूर्व आनंद आहे. हा अभिजात दर्जा टिकवून ठेवण्यासाठी गुणवत्तापूर्ण साहित्य निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे. संमेलने हे त्यासाठी दीपस्तंभ असल्याचा उल्लेख त्यांनी केला. श्रेया बुगडे यांनी, या संमेलनातून ज्येष्ठ महिला साहित्यिका तसेच नवोदितांचा उत्साह पाहिल्यास ही साहित्य परंपरा अखंडित राहील, असा आशावाद व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांना ‘यशस्वीनी’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. ‘अपराजिता’ या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच गोमंतकीय कथा-कादंबरीतील स्त्री या डॉ. वृंदा केळकर यांच्या तर डॉ. विद्या प्रभूदेसाई यांच्या गोमंतकीय मराठी कादंबरी या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सुनीता सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, स्त्रीयांनी स्वत:मधील न्यूनगंड बाजूला ठेऊन आपापल्या क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येण्याची गरज व्यक्त केली. समाजात वाईट गोष्टी घडत असल्या तरी चांगल्या गोष्टीतून त्यावर मात करण्यासाठी नवीन पिढीवर चांगले संस्कार व समज देण्याची जबाबदारी आपली असल्याचे नमूद केले.
पल्लवी धेंपे यांनी स्वागतपर भाषणात महिलांमध्ये असलेल्या प्रचंड उर्जेचा वापर विधायक कार्यातून करावा. तसेच महिलांनी आपल्या हक्काविषयी जागरूक राहावे. जिद्द, आत्मविश्वास, इच्छाशक्ती व आशावादातून महिला आपले ध्येय गाठू शकतात असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक भाषणात संगीता अभ्यंकर यांनी संस्थेच्या कार्याचा तर डॉ. विद्या प्रभूदेसाई यांनी संमेलनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री खांडेपारकर यांनी केले. तर सुषमा तिळवे यांनी आभार मानले. ग्रंथदिंडीने संमेलनाला सुऊवात झाली. उद्घाटन सोहळ्यानंतर निवडक ललित लेखांचे अभिवाचन, स्मार्ट साहित्यिक खेळ, कवयित्री संमेलन, अभिनेत्री श्रेया बुगडे यांची प्रकट मुलाखत अशी विविध सत्रे झाली.