महिलांनी आंतरिक शक्तीला सकारात्मक विचारांनी सजवावे
डॉ. मीनल सावंत यांचे प्रतिपादन ; पंचम खेमराज महाविद्यालयात महिला दिन उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी
महिला सक्षमीकरण ही प्रगतीशील समाजाची ओळख आहे. महिलांनी त्यांचे महत्त्व समजून घेऊन स्वतःची काळजी घेऊन त्यांचा सन्मान वाढवला पाहिजे. आत्मसन्मान विकसित करताना आपल्या आंतरिक शक्तीला सकारात्मक विचारांनी सजवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा महिलांना सशक्त आणि सन्माननीय वाटेल तेव्हाच त्या समाजात त्यांची ओळख योग्य पद्धतीने प्रस्थापित करू शकतील असे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमांमध्ये डॉ. मीनल सावंत यांनी प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सि. जि. शि. प्र. मंडळाच्या कार्याध्यक्षा ह. हा. श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले, वरिष्ठ प्रा. महेंद्र ठाकूर, महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. नीलम धुरी, सदस्या प्रा. डॉ. प्रतीक्षा सावंत, प्रा. डॉ. प्रगती नाईक आदी उपस्थित होते. डॉ. सावंत पुढे म्हणाल्या, महिलाही संपूर्ण कुटुंबाला चालना देणारी महत्त्वाची आधारप्रणाली आहे. आजच्या काळात महिलांनी आपल्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. स्त्रियांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे असते ती स्वतःच्या आहाराची काळजी घेणे. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर राहा. भोवतालचे जग कुठे चालले आहे, आपले कुटुंब, समाज, देश यांचा उद्धार कसा साधायचा या गोष्टींचा विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित करा असा संदेश त्यांनी दिला. यावेळी उद्घाटक सि. जि. शि. प्र. मंडळाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब ह. हा. सौ शुभदा देवी खेमसावंत भोंसले यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये प्रतिपादन केले की, आजच्या काळात स्त्रियांची भूमिका कौटुंबिक आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये महत्त्वाची आहे. इतिहासामध्ये आणि आजही कार्यरत असलेल्या महिलांचा आदर्श स्वतः समोर ठेवून सतत काम करा. स्वर्गीय श्रीमंत राजमाता सत्वशीलादेवी भोसले या शेवटपर्यंत कार्य मग्न होत्या. असेही त्या म्हणाल्या, कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये न डगमगता धैर्याने परिस्थितीशी मुकाबला करा असा संदेश त्यांनी दिला. वरिष्ठ प्रा. महेंद्र ठाकूर यांनी शुभेच्छा देताना जागतिक महिला दिन हा महिलांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेण्याचा, त्यांचा आदर करण्याचा आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करण्याचा दिवस आहे, महिलांनी स्वप्न बघावी त्यांचा पाठलाग करावा आणि समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा यासाठी त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे महिलांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या रणनीती, संसाधने आणि कृती ओळखण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी जगभरातील आवाहन आहे हाच यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 च्या एक्सेलेरेट ऍक्शन या थीमचा खराखुरा अर्थ आहे. गेल्या शतकात अनेकांच्या प्रयत्नातून स्त्री थोडी बंधनातून बाहेर पडत आहे. मानवी जीवनातील कोणतेही क्षेत्र तिला आता अवघड राहिलेले नाही. पुरुषांच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात आपली कर्तबगारी गाजवत आहे. तरी आमची स्त्री मुक्त आहे असे म्हणता येईल का? अशा शब्दात महिला विकास कक्षाच्या सदस्या प्रा. डॉ. प्रतीक्षा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्योजिका सौ.स्नेहल नंदकिशोर धुरी, सावंतवाडी. उद्योजिका सौ. दिप्ती दिवाकर कानडे, तेरसे बांबर्डे. सौ. अर्पिता अभय वाटवे (सावंतवाडी समुपदेशक महिला व बालक विशेष सहाय्यता कक्ष, सावंतवाडी.) उद्योजिका दिपिका दिलीप सावंत, सावंतवाडी. कु. सुप्रिया लिंगोजी राऊळ, माडखोल. श्रीमती अक्षता मिलिंद सावंत, माडखोल. सौ. दिपिका दिलीप राऊळ, माडखोल. श्रीमती अन्नपूर्णा आपासाहेब देसाई, हेवाळे. सौ. रश्मी बाबुराव नाईक, कारिवडे. सौ. प्रतिभा प्रभाकर कुणकेरकर, कुणकेरी. सौ. सुनंदा सूर्यकांत राऊळ, माडखोल. सौ. शर्मिला शशिकांत राऊळ, माडखोल. सौ. सुचिता रविंद्र परब, कारिवडे. सौ. सरिता सदानंद सावंत, माजगाव. सौ. दर्शना विश्वनाथ नाईक, सावंतवाडी. सौ. सुनीता किसान साळुंखे, सावंतवाडी. डॉ. मीनल चंद्रराव सावंत, सावंतवाडी. प्रा. नीलम देवेंद्र धुरी, सावंतवाडी. आधी कर्तुत्ववान महिलांचे सत्कार करण्यात आले. महाविद्यालयामध्ये वर्षभरामध्ये विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा (रांगोळी, चित्रकला, मेहंदी, नेलआर्ट, हेअरस्टाईल, प्रश्नमंजुषा) मधील विजेत्या विद्यार्थिनींचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. नीलम धुरी यांनी केले व सदस्या प्रा. डॉ. सौ. प्रगती नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मितल धुरी हिने केले.