कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Vari Pandharichi 2025: धावे हो जननी विठाबाई

04:05 PM Jun 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंढरपूर जवळच्या मंगळवेढा या गावी कान्होपात्रेचा जन्म झाला

Advertisement

By : मीरा उत्पात

Advertisement

ताशी : श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माची स्थापना केली. सर्वांना भगवंत भक्तीचा नवा मार्ग दाखवला. त्या वाटेवर अनेक संतांनी वाटचाल केली. जात, वय, लिंग, गरीब-श्रीमंत या साऱ्याच्या पलीकडे जाऊन विठ्ठल भक्तीची पताका उंच उंच फडकत राहिली. भगव्या झेंड्याखाली सारे एकत्र जमले.

वाळवंटात भक्तीचा मळा फुलवला. पुरुष संतांप्रमाणे स्त्री संतांनीही आपली नाममुद्रा उमटवली. त्यामध्ये कान्होपात्राचे नाव अग्रस्थानी आहे. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा या गावी कान्होपात्रेचा जन्म झाला. त्यावेळी मंगळवेढ्यावर बिदरच्या बहामनी राज्य सत्तेचा अंमल होता. मंगळवेढ्यात असलेल्या कृष्णा तलावाच्या काठावर एक महादेवाचे मंदिर होते.

त्या मंदिराजवळच शामा नावाची नायकीण नाचगाणे करून आपला उदरनिर्वाह करीत असे. तिची किर्ती दूरवर पसरली होती. तिच्या घरी श्रीमंत धनवान लोकांची ऊठबस असे. अशा या शामा नायकिणीच्या पोटी एक सुंदर कन्या जन्मली. कान्होपात्रा!. आपल्या अत्यंत देखण्या रूपवती कन्येने आपला व्यवसाय पुढे चालवावा, भरपूर द्रव्य कमवावे, अशी तिच्या आईची इच्छा होती.

त्यात ती वयात आल्यावर तिच्या देखणेपणाची ख्याती बिदरच्या बादशहापर्यंत पोहोचली. आणि तिला मिळवण्यासाठी बादशहाने शामापुढे संपत्ती, जमीन जुमला याचा प्रस्ताव ठेवला. आईला हेच हवे होते. तिने कान्होपात्रेस बादशहाच्या स्वाधीन होण्यास सांगितले. पण ही या साऱ्या मोहमायेपासून दूर होती. तिचे मन विठ्ठल भक्तीत रमले होते. तिला आस लागली होती त्या विश्वपुरूषाची! सावळ्या विठ्ठलाची!

तिने बादशहाला नकार दिला. त्यामुळे बादशहाचा अहंकार दुखावला बादशहाने तिला पकडून आणण्यासाठी आपले सरदार मंगळवेढ्यास पाठवले. कान्होपात्रेवर हा मोठा बिकट प्रसंग आला. आपले शील भ्रष्ट होऊ नये म्हणून घरासमोरून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडी बरोबर ती पंढरपुरात पोहोचली. बादशहाच्या सरदारांना हे वृत्त कळाल्यावर ते पंढरपुरात आले. तेव्हा करूणवाणीने तिने पांडुरंगाचा धावा केला.

नको देवराया अंत असा पाहू ।
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले ।
मजलागी जाहले तैसे देवा।
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी विठाबाई ।
मोकलूनी आस जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ।।

भक्तवत्सल पांडुरंगाच्या पायाला मिठी मारत ती विनवत होती. अत्यंत करूणपणाने विठ्ठलाचा धावा करून तिने आपले प्राण विठ्ठलचरणी अर्पण केले. तिचा आत्मा पांडुरंगात विलीन झाला. तिचा मृतदेह मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ पुरण्यात आला. तिथे तरटी वृक्ष उगवला. दगडातून उगवलेला हा तरटी वृक्ष म्हणजे एक आश्चर्यच आहे.

उभ्या महाराष्ट्रात पंढरपूरला कान्होपात्रेच्या समाधीतून काळया दगडात उगवलेला व मंगळवेढा येथे कान्होपात्रेच्या जन्मस्थानी या दोनच ठिकाणी अशा प्रकारचे वृक्ष आहेत. कान्होपात्रेच्या समाधीचे दर्शन घेताना तिच्या उत्कट विठ्ठलभक्तीची, तिच्या विठ्ठलावरच्या निष्ठेची जाणीव होऊन डोळे पाणावतात.

कान्होपात्राचे अभंग संख्येने कमी आहेत. पण त्यातील विठ्ठल भक्ती असीम आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने तिचे स्मरण झाले. पंढरपूरला गेल्यावर कान्होपात्रेच्या समाधीचे दर्शन जरुर घ्या. काळ्या दगडातून उगवलेला तरटी वृक्ष नक्कीच तुम्हाला कान्होपात्रेच्या अलौकिक विठ्ठलभक्तीची साक्ष देईल.

Advertisement
Tags :
#pandharpur#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#vitthal templeashadhi wari 2025Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohlasant tukaram maharaj palkhi 2025Vari Pandharichi 2025
Next Article