उचगावात महिलांना सुमारे २४ लाखांचा गंडा
सोने आणि कर्जस्वरुपात घेतली रक्कम
कोल्हापूर/ उचगाव
उचगाव (ता. करवीर) येथील अनेक महिलांकडून मुलीच्या उपचारासाठी आणि इतर कारणे सांगून सुमारे २३ लाख ९२ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अंजना शिवाजी कमलाकर (वय ६५, रा. उचगाव पूर्व, ता. करवीर) यांनी दिली. याप्रकरणी गांधीनगर पोलीसांत नजमा नजिर अहमद मुल्ला (वय अंदाजे ३५, रा. जानकीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, उचगाव पूर्व, ता. करवीर) हिच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.
याबाबतची माहिती अशी की, नजमा हिने आपल्या मुलीच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे असे सांगून अंजना कमलाकर आणि इतर महिलांकडून मार्च २०२१ पासून वेळोवेळी रक्कम घेतली. तसेच काही बँकांमध्ये या महिलांच्या नांवे कर्ज काढून त्या कर्जाचे पहिले हप्ते भरुन ही कर्जे थकीत ठेवली. काही महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन कोणत्यातरी बँकांमध्ये ठेवून त्या सोन्यावर कर्ज काढले. अशा प्रकारे नजमा मुल्ला यांनी आजपर्यंत या महिलांची २३ लाख ९२ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याबाबतची फिर्याद अंजना कमलाकर यांनी दिली. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.