पर्यावरण संरक्षणात स्त्रिया
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात महिलांनी भरीव योगदान दिलेले आहे. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उद्धरी’ असे म्हटले आहे, ते खरेच आहे. भगिनी, सखी ऊपांत वावरणारी स्त्राr पर्यावरण क्षेत्रातही अग्रेसर ठरलेली आहे. राजस्थानात बिश्नोई समाजातल्या पुऊषांच्या बरोबरीने तिथल्या स्त्रियांनीही ‘खेजडी’ या पवित्र वृक्षांच्या संरक्षणासाठी आहुती दिलेली आहे.
अमृतादेवी बिश्नोई आणि त्यांच्या तीन मुली तसेच गावातील समविचारी अशा एकूण 363 जणांनी 11 सप्टेंबर 1730 रोजी राजाज्ञेविऊद्ध बंड पुकारले. नवीन राजवाड्याच्या निर्मितीसाठी चुनाभट्टी पेटविण्यास खेजडी वृक्षांची लाकडे गरजेची असल्याने, ती तोडण्यासाठी मारवाडचे राजे अभयसिंह यांनी आदेश दिला होता. राजाज्ञा अंमलात आणण्यासाठी सैनिक जोधपूर-जाडन मार्गावर असणाऱ्या खेजाडगी गावात आले. त्यावेळी अमृतादेवी आणि त्यांच्या 363 साथीदारांनी, ‘आमचे मस्तक त्यागू, पण जिवंत असेपर्यंत खेजडी वृक्ष तोडू देणार नाही’, असा निर्णय घेतला. ‘खेजडी’ वृक्ष तोडण्यासाठी जेव्हा सैनिक पुढे सरसावले, तेव्हा अमृतादेवी आणि त्यांच्या ध्येयवादी साथीदारांनी झाडांना मिठी मारली. ‘प्राण गेले तरी बेहत्तर’, असे म्हणून झाडांच्या बुध्यांना घट्ट पकडले. सैनिकांनी दया-माया न दाखविता 363 जणांची निर्घृणरित्या हत्या केली. जगाच्या इतिहासात वृक्ष संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करण्याची ही घटना अभूतपूर्व अशीच होती.
अमृतादेवी आणि तिचे समविचारी साथीदार ‘खेजडी’ वृक्षाचे संरक्षण व्हावे म्हणून मृत्यूला निर्भयपणे सामोरे गेले. आपल्या आदेशानुसार सैनिकांनी ‘खेजडी’ वृक्ष तोडण्यासाठी अडथळे निर्माण करणाऱ्या अमृतादेवी आणि तिच्या साथीदारांची निर्घृणपणे हत्या केल्याची वार्ता जेव्हा महाराज अभयसिंह यांना समजली, तेव्हा त्यांना अतीव वेदना झाली. त्यानंतर त्यांनी जेथे जेथे बिश्नोई जमातीचे वास्तव्य असलेल्या गावोगावीच्या ‘खेजडी’ वृक्षांची तोड करण्यास कडक बंदी घातली. बिश्नोई समाजात ज्या कृष्ण मृगाला पवित्र मानून, त्याचे पारंपरिकरित्या रक्षण करण्यासाठी नियम केला होता, त्या कृष्ण मृगाच्या शिकारीवरती कायदेशीररित्या बंदी घातली.
पंधराव्या शतकात जन्माला आलेल्या संत जंभेश्वर यांनी राजस्थानात वृक्ष-वेली आणि पशु-पक्षी यांच्या संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य देण्याबरोबर, भूतदया आणि मानवी मूल्यांच्या विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या बिश्नोई संप्रदायाची स्थापना केली होती. त्या संप्रदायाच्या अनुयायी असणाऱ्या अमृतादेवी आणि त्यांच्या साथीदारांनी ‘खेजडी’ वृक्षाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च आत्मबलिदान केले. पर्यावरण संरक्षणासाठी त्याग करणाऱ्या अमृतादेवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची स्मृती अखंड आणि अक्षय राहावी म्हणून खेजडगी गावात स्मृतीस्थळ उभारले. आज तेथे जंभेश्वर भगवान यांचे सुंदर मंदिर, अमृतादेवी यांचा पुतळा यांच्यासह कडुनिंब, खेजडी आदी वृक्षांनी समृद्ध पशु-पक्षी यांना पूर्णपणे अभय प्रदान करणारे ‘स्मृतीवन’ निर्माण केलेले आहे.
उत्तराखंडातल्या चमोलीत ‘रेनी’ या गावातल्या गौरादेवीने महिला मंगल दलाचे नेतृत्व ‘चिपको’ आंदोलनात 1974च्या सुमारास करून त्यांनी जंगलतोडीला रोखले. रिया राना या स्त्राrनेसुद्धा पर्यावरण संरक्षणासाठीच्या लढ्यात आपले योगदान दिलेले आहे. उत्तराखंडातल्या डेहरादूनमध्ये वावरणाऱ्या वंदना शिवा यांनी समाजात जैविक संपदा, नैसर्गिक साधनांचा योग्यरीतीने वापर केला जावा आणि पारंपरिकरित्या कृषी व्यवसाय व्हावा आणि इथल्या पिकांचे संवर्धन व्हावे, यासाठी चळवळ उभारली. आपल्या पर्यावरणीय विचारधारेच्या समर्थनासाठी त्यांनी वीस पुस्तकांचीही निर्मिती केलेली आहे. भारताला जो जैवविविधतेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे, त्याचे रक्षण व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न आरंभिलेले आहेत. त्यांच्या अभिनव अशा ‘नवधान्य’ चळवळीमुळे पारंपरिक वाणाच्या संचयिका देशभरात सुरू झाल्या आणि त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्र उघडकीस येण्यास मदत झाली.
मेधा पाटकर यांनी नर्मदेवरती उभ्या राहिलेल्या ‘सरदार सरोवर प्रकल्पा’च्या विरोधात बुलंदपणे आवाज ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाद्वारे उठविला. जंगलनिवासी जनजातींच्या हक्कांचे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लोकलढा आजही चालू आहे. मनेका गांधी यांनी ‘पीपल फॉर अॅनिमल’ या संस्थेच्या माध्यमातून मूक प्राण्यांवरती होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वेळोवेळी वाचा फोडलेली आहे. जनावरांविषयी समाजात आदरभाव निर्माण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या वाणी आणि लेखणीद्वारे लोक जागृतीवर भर दिलेला आहे. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत आपल्या देशात ‘वन्यजीव संरक्षण कायदा 1972’, ‘वन संवर्धन कायदा 1980’, ‘पर्यावरण संरक्षण कायदा 1986’ लागू करण्यात आले. भारतात त्यांनी समर्थपणे राबविलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे नष्ट होण्याच्या वाटेवरती असलेल्या पट्टेरी वाघांच्या संरक्षणाला प्राधान्य लाभले.
विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या प्रमुख या नात्याने वावरताना सुनीता नारायण यांनी पर्यावरण संरक्षणात विशेष योगदान दिलेले आहे. ‘डाऊन टू अर्थ’ या पाक्षिकाद्वारे त्यांनी देशभरातल्या पर्यावरणीय समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य समर्थपणे चालविलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके अशा घटकांच्या वारेमाप वापरामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला, त्याचा उपाय करण्यासाठी अमेरिकेतल्या रेचल कार्सन यांनी, केलेल्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने समाजातला पर्यावरणीय दृष्टिकोन विकसित होण्यासाठी क्रांतिकारी भूमिका बजाविलेली आहे. आफ्रिकेतल्या केनियासारख्या राष्ट्रात जीवशास्त्राचे अध्ययन केलेल्या वंगारी माथाई यांनी, नियोजनबद्ध वृक्षारोपण आरंभून हरित पट्ट्याचे संरक्षण करण्यासाठी यशस्वीरित्या मोहीम 1977 पासून राबविली. त्यांच्या कार्यासाठी शांततेचे प्रतिष्ठित ‘नोबेल’ प्राप्त करणाऱ्या, त्या आफ्रिकेतल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
इंग्लंडच्या जैन बुडाल यांनी, कुमार अवस्थेत टांझानियातल्या जंगलात असणाऱ्या चिंपांझींच्या सामाजिक आणि कौटुंबिक स्नेहबंधाचे संशोधन करून त्यांच्या संरक्षणासाठी मोहीम राबविली. ‘रूट्स अॅण्ड शूट्स’ संस्थेमार्फत या क्षेत्रात साठ वर्षे त्या सक्रिय होत्या. डायना फोसी यांनी, आफ्रिकेतल्या रवांडात गोरिलाचे अस्तित्व आणि नैसर्गिक अधिवास सुरक्षित व्हावा, यासाठी मोहीम आरंभली. जंगली शाबुदाण्याची शिकार आणि जंगलतोडीच्या विरोधात लढताना त्यांची गूढरीत्या हत्या करण्यात आली. मरीना सिल्वा यांनी, ब्राझिलमधल्या पर्जन्य जंगलांचे रक्षण व्हावे, यासाठी 1980 पासून प्रतिकूल सामना करीत चळवळ चालू ठेवली. जगभरात पर्यावरण जागृती आणि शिक्षणासाठी महिलांनी प्रेरणादायी झुंज दिलेली आहे. त्यातून महिलांचे सामर्थ्य लक्षात येते.
राजेंद्र पां. केरकर
